| कर्जत | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील नेरळनजीकच्या बिरदोले गावातील 25 वर्षीय युवा शेतकरी रोशन कचरू कालेकर याचा 26 मे रोजी वीज पडून मृत्यू झाला होता. त्याच्या कुटुंबियांना सानुग्रह अनुदान म्हणून चार लाख रुपये देण्यात आले.
केंद्र शासनाच्या नैसर्गिक आपत्ती निकषानुसार नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या व्यक्तीला सानुग्रह अनुदान दिले जाते. 26 मे रोजी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडत असताना रोशन पावसाने आपल्या शेतीचे काही नुकसान झाले आहे काय? ते पाहण्यासाठी शेतावर गेला असता त्याच्या अंगावर वीज पडून त्याचा मृत्यू झाला. त्याच्या कुटुंबियांना हे सानुग्रह अनुदान मिळावे म्हणून तहसीलदार डॉ. धनंजय जाधव यांनी विशेष प्रयत्न केले.
रोशनचा भाऊ जगदीश कालेकर यांनी सानुग्रह अनुदानाबाबतचे पत्र आ. महेंद्र थोरवे यांच्या हस्ते स्वीकारले. याप्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी डी.डी. टेळे, तहसीलदार डॉ. धनंजय जाधव, पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड आदी उपस्थित होते. सानुग्रह अनुदानची रक्कम कालेकर कुटुंबियांनी दिलेल्या युनियन बँक ऑफ इंडियाच्या नेरळ शाखेमध्ये जमा करण्यात येणार आहे.