गोलंदाजांनी पाजले पाणी; दुसर्या क्वालिफायरमध्ये धडक
। मुंबई । प्रतिनिधी ।
मुंबई इंडियन्सने शुक्रवारी (दि.30) न्यु चंदीगडच्या मैदानावर रंगलेल्या आयपीएल 2025च्या एलिमिनेटर सामन्यात गुजरात टायटन्सचा 20 धावांनी पराभव केला आहे. या रोमहर्षक विजयासह मुंबईने दुसर्या क्वालिफायरमध्ये प्रवेश केला आहे. रोहित शर्मा, जॉनी बेअरस्टो, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा व हार्दिक पंड्या यांच्या धडाकेबाज फलंदाजीने संघाला 228 धावांचा पल्ला गाठून दिला. त्याचबरोबर मुंबईच्या गोलंदाजांनी देखील अप्रतिम गोलंदाजी करत गुजरातच्या चारी मुंड्या चित केल्या. आयपीएल 2025 मधील पहिल्या सहापैकी पाच सामने गमावूनही मुंबईचा संघ प्ले ऑफमध्ये पोहोचला. त्यामुळे मुंबई इंडियन्सने त्यांना चॅम्पियन संघ का म्हणतात, हे पुन्हा एकदा दाखवले आहे.
यावेळी नाणेफेक जिंकून कर्णधार हार्दिक पांड्याने प्रथम फलंदाजीचा धाडसी निर्णय घेतला आणि मुंबईच्या पलटनने गुजरातविरुद्धच्या एलिमिनेटर लढतीत वादळी खेळी केली. जॉनी बेअरस्टोने मुंबईकडून पदार्पण केले आणि त्याला रोहित शर्माच्या आक्रमक खेळीची साथ मिळाली. दरम्यान, रोहितला पहिल्या तीन षटकांत दोन जीवदान देऊन गुजरातने खूप मोठी चूक केली. तो काहीकाळ शांत राहिला, परंतु जॉनी बेअरस्टोने वादळी खेली केली. त्याने 22 चेंडूंत 47 धावा चोपल्या. रोहितसह त्याने 84 धावा जोडल्या. त्यानंतर रोहित व सूर्यकुमार यादव या जोडीनेही 59 धावांची भागीदारी केली. परंतु, सुर्यकुमार 33 धावांवर बाद झाला. रोहितने मात्र हात मोकळे करताना 28 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. परंतु, तो देखील 50 चेंडूंत 81 धावांवर बाद झाला. त्यानंतर हार्दिक पांड्या (22) तिलक वर्मा (25) यांनी फिनिशिंग टच देत निर्धारित 20 षटकांत गुजरात समोर 228 धावांचा डोंगर उभा केला.
मुंबईच्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरातला पहिल्याच षटकातच धक्का बसला. कर्णधार शुभमन गिल एका धावेवर बाद झाला. त्यानंतर साई सुदर्शन व कुसल मेंडिस यांनी चांगली खेळी केली. परंतु, मेंडिसने स्वतःहून त्याचा बळी दिला. फटका मारण्याच्या प्रयत्नात मेंडिस 20 धावांवर हिटविकेट झाला. त्यांनतर सुदर्शन मैदानावर उभा राहिला आणि त्याने सातवी पन्नासपेक्षा अधीक धावांची खेळी केली. सुदर्शन व सुंदर यांनी साडेअकराची सरासरी कायम राखताना गुजरातच्या विजयाच्या आशा जीवंत ठेवल्या होत्या. बोल्टने टाकलेल्या 13व्या षटकात सुंदरने 6,6,4 असे फटके खेचून 18 धावा जोडल्या. ही जोडी तोडण्यासाठी मुंबईने जसप्रीत बुमराहला परत गोलंदाजीला बोलावले. त्याने अप्रतिम यॉर्कवर सुंदरला 48 धावांवर त्रिफळाचीत केले. गुजरातला 37 चेंडूंत 78 धावांची गरज असताना सुदर्शन मैदानावर उभा होता. शेरफाने रुथरफोर्डने मुंबईवर दडपण निर्माण केले. मात्र, रिचर्ड ग्लीसनने सुदर्शनला 81 धावांवर त्रिफळाचीत केले. त्यांनतर गुजरातला शेवटच्या षटकात 24 धावांची गरज असताना हार्दिक पंड्याने ग्लीसनच्या हाती चेंडू दिला. ग्लीसनने पहिल्या तीन चेंडूवर 3 धावा दिल्या. ग्लीसन हॅमस्ट्रिंगमुळे तंबूत परतला अन् तीन चेंडू टाकण्यासाठी अश्वनी कुमार आला. त्याने शाहरुखचा (13) बळी घेतला आणि विजयावर शिक्कामोर्तब केले. गुजरातला 6 बाद 208 धावाच करता आल्यामुळे मुंबईने 20 धावांनी हा सामना जिंकला.
मुंबईला आता 1 जूनला अहमदाबाद येथील मैदानावर होणार्या क्वालिफायर 2 मध्ये पंजाब किंग्सचा सामना करायचा आहे.
चंदीगडमध्ये ‘हिट’मॅन शो
50 चेंडूंत
81 धावा
9 चौकार
4 षटकार
रोहित शर्माने आयपीएलमध्ये चंदीगडचे मैदान गाजवत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. गुजरात टायटन्सच्या खेळाडूंनी दिलेल्या दोन जीवदानाचा फायदा उचलताना रोहितने आतापर्यंत एकाही भारतीयाला न जमलेला विक्रम केला आहे. त्याशिवाय त्याने विराट कोहलीच्या एका विक्रमाच्या पंक्तित मानाचे स्थानही पटकावले आहे. जॉनी बेअरस्टो व रोहित शर्मा यांनी मुंबई इंडियन्सला दमदार सुरुवात करून दिली. रोहितला 4 व 12 धावांवर जीवदान मिळाले आणि त्याचा फायदा त्याने उचलला. बेअरस्टो बाद झाल्यानंतर रोहितने हात मोकळे करताना 28 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. त्याचबरोबर रोहित आयपीएलच्या इतिहासात 300 षटकार मारणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. सर्वाधिक आयपीएल षटकार ख्रिस गेल (357) याच्या नावावर आहे. या सामन्यात रोहित शर्मा 81 धावांवर बाद झाला. मात्र, यादरम्यान त्याने आणखी एक विक्रम नावावर केला आहे. विराट कोहलीनंतर आयपीएलमध्ये 7 हजार हून अधिक धावा करतारा तो पहिला खेळाडू ठरला आहे. त्याचबरोबर सामनावीर पुरस्कार देखील रोहित शर्माने प्राप्त केला आहे.