। संगमनेर । प्रतिनिधी ।
संगमनेर तालुक्यातील काकडवाडी येथील काव्या संदीप कासार हिने काकरविटा झापा (नेपाळ) येथे आयोजित कराटे स्पर्धेत सुवर्णपदक मिळवीत नेत्रदीपक यश संपादन केले आहे. इयत्ता पाचवीत शिक्षण घेणारी काव्या कासार दोन वर्षांपासून कराटे प्रशिक्षण घेत होती. नुकत्याच नेपाळ येथील काकरविटा झापा येथे आयोजित मेयर कप 2025 स्पर्धेत तिला प्रतिनिधित्व करण्याचा बहुमान मिळाला होता. अकराव्या चॅम्पियनशीप कराटे स्पर्धेत तिने सुवर्णपदक, तर काथा स्पर्धेत रौप्यपदक मिळविले आहे. याकामी तिला प्रशिक्षक आनंद रोकडे व सविता रोकडे यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल काव्या कासार हिचे पदाधिकारी व मान्यवरांकडून कौतुक करण्यात येत आहे. काव्या कासार हिने या अगोदरही स्थानिक पातळीवरील स्पर्धांमध्ये उल्लेखनिय कामगिरी केलेली आहे. तिच्या कामगिरीत सातत्य राहिल्याने तिला यश मिळाले आहे.