। रायगड । प्रतिनिधी ।
एमपीएल 2025 सुरू होण्यासाठी अवघ्या चार दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. त्यापूर्वी सर्वच संघ विजेतेपद पटकावण्यासाठी कंबर कसलेले दिसून येत आहेत. पहिल्या दोन हंगामात फारसे यशस्वी न ठरलेल्या रायगड रॉयल्स संघाची तयारी देखील अंतिम टप्प्यात आलेली आहे. आपल्या तयारीचा अखेरचा भाग म्हणून त्यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
एमपीएल सोबतच मुंबई क्रिकेट असो.ची मुंबई टी-20 लीग देखील खेळली जाणार आहे. ही स्पर्धा मुंबईत पार पडणार आहे. या स्पर्धेत ‘मुंबई साउथ सेंट्रल मराठा रॉयल्स’ हा संघ सहभागी होत आहे. मराठा रॉयल्स व रायगड रॉयल्स या दोन्ही संघांची मालकी कपिल सन्स यांच्याकडे आहे. त्यामुळे आपापल्या लीग पूर्वी दोन्ही संघ एकत्र सराव करताना दिसतील. त्यासोबतच त्यांच्या दरम्यान सराव सामने देखील होणार आहेत.
सध्या दोन्ही संघ ठाणे येथील दादोजी कोंडदेव स्टेडियम येथे सराव करतान आहेत. या दोन्ही संघांदरम्यान 31 मे व 1 जून रोजी सराव सामने होतील. त्यानंतर दोन्ही संघ आपापल्या स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी रवाना होणार आहेत. मराठा रॉयल्स संघात सिद्धेश लाड, तुषार देशपांडे, रोहन राजे व सक्षम पराशर असे नामांकित खेळाडू आहेत. तर, या संघाला भारतीय संघाचे माजी सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायर हे मार्गदर्शन करत आहेत. दुसरीकडे, पहिल्या हंगामात सोलापूर रॉयल्स तर दुसर्या हंगामापासून रायगड रॉयल्स असे नामकरण केलेल्या संघाला अद्याप यश मिळाले नाही. मात्र, तिसर्या हंगामासाठी त्यांनी हितेश वाळुंज व हर्ष मोगावीरा यांच्यासारखे मोठे खेळाडू संघात सामील करून घेतले आहेत. तर, कर्णधार ऋषभ राठोड, विकी ओस्तवाल, सिद्धेश वीर, तनय संघवी व स्वप्निल फुलपगार हे तिसर्या हंगामात आपल्या संघाला विजेतेपद मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.