जूनपासून नवे नियम लागू करणार
। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
जवळपास 150 वर्षांचा इतिहास असलेल्या क्रिकेट खेळात इतक्या वर्षात अनेक बदल झाले आहेत. सुरुवातीला एकच प्रकार असलेल्या या खेळाचे आता वेगवेगळे प्रकार झाले आहेत. बरेच नियम वेळेनुसार बदलण्यातही आले आहेत. अनेक नवे प्रयोगही झाले आहेत. आता पुन्हा एकदा क्रिकेटमध्ये नवीन प्रयोग होताना दिसणार आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील काही नियमांमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद मोठे बदल करणार आहे. एक दिवसीयमधील चेंडू, कन्कशन सब्सिट्यूट, डीआरएस अशा बाबतीतील नियमांबाबत आयसीसीने मोठे निर्णय घेतले आहेत. आयसीसी जूनपासून हे नवे नियम लागू करणार आहेत.
आयसीसीने केलेल्या नव्या नियमामधील एक महत्त्वाचा नियम म्हणजे एकदिवसीय चेंडू बदलाचा नियम. गेल्या काही वर्षांपासून या सामन्यातील एका डावात दोन नवीन चेंडू वापरले जात होते. त्यामुळे चेंडू रिव्हर्स होत नसल्याची अनेकांची तक्रार होती. परंतु, आता नव्या नियमानुसार सुरुवात दोन नवीन चेंडूंनी होईल, आणि शेवट त्यातील एकाच चेंडूने होणार आहे. आयसीसीने दिलेल्या माहितीनुसार, 1 ते 34 षटकापर्यंत दोन नवीन चेंडू असतील. मात्र, 34व्या षटकानंतर गोलंदाजी करणार्या संघाला त्या दोन चेंडूंपैकी एकच चेंडू निवडावा लागेल, जो 35 ते 50 षटकापर्यंत वापरला जाईल. जर संपूर्ण सामन्यात कधीही चेंडूमध्ये काही समस्या झाली, तर त्या परिस्थितीनुसार आणि तशाच स्थितीतील दुसरा चेंडू पंच बदलू शकतात.
त्याचबरोबर आयसीसीने आता नियमात असा बदल केला आहे की, कन्कशन सब्स्टिट्यूटसाठी प्रत्येक संघाला सामना सुरू होण्यापूर्वी सामनाधिकार्यांकडे 5 पर्यायी खेळाडूंची नाव द्यायची आहेत. त्यामध्ये एक यष्टीरक्षक, एक फलंदाज, एक वेगवान गोलंदाज, एक फिरकीपटू आणि एक अष्टपैलू खेळाडू असायला हवा. म्हणजे कन्कशन सब्स्टिट्यूट म्हणून एखाद्या खेळाडूला खेळण्याची परिस्थिती उद्भवली, तर या 5 खेळाडूंमधील खेळाडूला खेळण्याची संधी मिळेल. परंतु, नियमानुसार जर फिरकीपटू संघातून बाहेर जाणार असेल, तर कन्कशन सब्स्टिट्यूटही फिरकीपटूच असणार आहे. परंतु, कन्कशन सब्स्टिट्यूट म्हणून खेळणार्या खेळाडूलाच कन्कशनमुळे परत बाहेर जावे लागले, तर सामनाधिकारी या परिस्थितीचा नीट आढावा घेऊन यादीत असलेल्या 5 खेळाडूंव्यतिरिक्त दुसर्या खेळाडूला खेळण्याची परवानगी देऊ शकतात. मात्र, या परिस्थितही सारखीच शैली असणारा सब्स्टिट्युट खेळाडू पाहिजे. दरम्यान आयसीसीने सांगितले की, डीआरएस आणि बाऊंड्री लाईन जवळील झेलबाबातच्या बदललेल्या नियमांबद्दल नंतर माहिती देण्यात येईल.
कसोटीमध्ये ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका संघात 11 जूनपासून सुरू होणार्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यापासून हे नियम लागू होणार आहेत. तर, एक दिवसीय सामन्यांत 2 जुलैपासून श्रीलंका आणि बांग्लादेश संघात सुरू होणार्या मालिकेपासून लागू होतील. टी-20 मध्येही या दोन संघातच 10 जुलैपासून सुरू होणार्या मालिकेतून हे नियम लागू होणार आहेत.