। नेरळ । वार्ताहर ।
कर्जत तालुक्यातील नेरळ येथील श्री संत ज्ञानोबा तुकोबा वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीने लहान मुलांसाठी सुट्टीमधील उपक्रम म्हणून अध्यात्मिक बालसंस्कार शिबीर आयोजित केले जाते. 15 दिवस आयोजित केल्या जाणार्या या संस्कार शिबिराला नेरळ येथे सुरुवात झाली. तालुक्यातील 50हून अधिक बालकांनी या अध्यात्मिक संस्कार शिबिरात सहभाग नोंदवला असून, हे निवासी शिबीर आहे.
नेरळ येथील श्री संत ज्ञानोबा तुकोबा वारकरी शिक्षण संस्था यांच्याकडून कैलाश महाराज भोईर हे बालसंस्कार शिबिर आयोजित करीत असतात. या बालसंस्कार शिबिरात 15 दिवस निवासी शिक्षण दिले जाणार असून, त्यात गीता वाचन, पखवाज वाजवणे, प्रवचन, हरिपाठ, कीर्तन, वारकरी भजन गायन आणि समाज प्रबोधन आणि वैदिक शिष्टाचार या विषयांवर ज्ञान दिले जाणार आहे. कीर्तनकार कैलाश महाराज भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली देवाची आळंदी येथील पखवाज संगीत विशारद भगवान महाराज पांचाळ आणि संगीत विशारद निलेश म्हसकर हे बालसंस्कार शिबिरात मार्गदर्शन करतील. नेरळ येथील मोहाचीवाडी येथे असलेल्या श्री संत ज्ञानोबा तुकोबा वारकरी शिक्षण संस्थेत हे शिबीर चालणार आहे. या शिबिरात पाचवी ते दहावीमधील विद्यार्थी यांचा सहभाग असून, या अध्यात्मिक बालसंस्कार शिबिराचे हे 13वे वर्षे आहे.
या शिबिराचे उद्घाटन नेरळ ग्रामपचायतच्या सरपंच उशा पारधी आणि कृष्णा पारधी यांनी पूजन करून केली तर वीणापूजन आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी पूजन नेरळ ग्रामपंचायतीचे उपसरपंच मंगेश म्हसकर यांनी केले. याप्रसंगी हभप पंढरीनाथ तांबोळी, मनोहर महाराज हिलाल, मारुती दुर्गे, जनार्दन थोरवे, गुरुनाथ शिंगटे, जैतु महाराज शेळके, लहू महाराज शेळके, जनार्दन थोरवे, विष्णू महाराज शेळके, बाळाराम मसने, काशिनाथ मस्ने, बळीराम कराळे, गजानन कोळंबे, हरिभाऊ पारधी, कल्पना हिलाल, कांता राऊत, सरस्वती पाटील, ज्योती मते आणि बाळू हिलाल आदी उपस्थित होते.