लाईट ऑफ लाईफ ट्रस्टचा पालक मेळाव्यातून अनोखा उपक्रम
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
ग्रामीण भागातील गरीब मुले शिकली पाहिजेत, हा ध्यास घेऊन लाईट ऑफ लाईफ ही संस्था शिकविण्याचे काम करीत आहे. या संस्थेने पालकांसाठीदेखील एक दिवस म्हणून पालक मेळाव्यासारखा अनोखा उपक्रम राबविला. पाककला, टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवणे, समूह गीतगायन आणि सामूहिक नृत्य या स्पर्धा व खेळ घेऊन पालकांचे लहानपण जपण्याचा प्रयत्न केला. ‘आमचाही एक दिवस’ या संकल्पेतून हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाला पालकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
पालक नेहमीच आपल्या कामात व्यस्त असतात. त्यांना बालपण जगता येत नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी एक दिवस म्हणून पालक मेळावा बामणगाव-गरूडपाडा येथील दादा गार्डन सभागृहात बुधवारी आयोजित करण्यात आला. ‘आमचा ही एक दिवस’ या संकल्पनेतून पालकांसाठी मेळाव्यातून खेळ व स्पर्धांमध्ये सहभागी होण्याची संधी प्राप्त करून दिली.
लाईट ऑफ लाईफ ट्रस्ट ही शैक्षणिक-सामाजिक संस्था गेली 19 वर्षे डॉ. विली यांच्या मार्गदर्शनाखाली अलिबाग व मुरुड तालुक्यामध्ये कार्यरत आहे. लाईट ऑफ लाइफ ट्रस्ट विद्यार्थ्यांना शिकविण्याबरोबरच त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठीदेखील उपक्रम राबवित आहे. सामाजिक बांधिलकी जपत ही संस्था मदतीचा हात देत असते. जसे विद्यार्थ्यांसोबत अनेक उपक्रम घेत असते तसेच पालकांसोबतसुद्धा विविध उपक्रम घेते. एक दिवस आमचाही बहरण्याचा हा मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेवून 25 नोव्हेंबरला आनंदो प्रकल्पांतर्गत दादा गार्डन हॉल गरूडपाडा-बामणगाव येथे पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य शिक्षक संघ तालुका शाखेचे अध्यक्ष प्रमोद भोपी, अतुल गुरव, सुरेश पाटील, लाईट ऑफ लाईफ ट्रस्ट आनंदो प्लस प्रकल्पाच्या प्रकल्प समन्वयक आर्या राऊत, आनंदो अधिकारी अनुजा राऊळ, अनंत प्रकल्पाचे वरिष्ठ अधिकारी जगदीश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. दीप प्रज्ज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
अलिबाग व मुरूड तालुक्यातील रामराज, बेलोशी, बोर्ली, वळके या भागातून 278हून अधिक पालक या मेळाव्यात सहभागी झाले होते. यावेळी पालकांसाठी खास पाककला, टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवणे, समूह गीतगायन आणि सामूहिक नृत्य या स्पर्धा घेण्यात आल्या. तसेच काही फनी गेम्ससुद्धा घेण्यात आले होते. या स्पर्धा व खेळांचे परीक्षक म्हणून प्रमोद भोपी, अतुल गुरव, सुरेश पाटील यांनी काम पाहिले. पालक सभेच्या माध्यमातून लहानपणीचे खेळ पालकांना खेळण्याची संधी मिळाली. त्याचा आनंद पालकांनी मनमुरादपणे लुटला. यावेळी स्पर्धेतील विजेत्या पालकांचा बक्षीस देऊन गौरव करण्यात आला. या कार्यक्रमात पालकांना प्रेरणा मिळावी यासाठी लाईट ऑफ लाईफ ट्रस्टचे जे विद्यार्थी स्वतःच्या पायावर उभे राहून स्वतःच्या घराचा डोलारा सावरण्यासाठी सज्ज झाले आहेत, अशा विद्यार्थ्यांच्या पालकांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडण्यासाठी संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन आनंदो प्लस प्रकल्पाच्या प्रकल्प समन्वयक आर्या राऊत, आनंदो अधिकारी अनुजा राऊळ, आनंदो प्रकल्पाचे सेंटर एक्झिक्युटिव्ह रश्मी अष्टमकर, राणी जाधव, अपेक्षा शेळके, सोनल घरत तसेच सर्व शिक्षकांनी केले.
