शेतकर्यांना 25 हजार फळझाडांचे वाटप; लाईट ऑफ लाईफ ट्रस्टचा उपक्रम
। कर्जत । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यातील 600 आदिवासी शेतकर्यांना 25 हजार 500 फळझाडांचे वाटप लाईट ऑफ लाईफ ट्रस्टच्या जागृती प्रकल्पाच्या माध्यमातून करण्यात आले. गेल्या पाच दिवसांपासून आदिवासी वाड्यावर जाऊन या फळझाडे वाटपाचे काम सुरु होते. आदिवासी शेतकर्यांच्या आर्थिक उत्पनात वाढ होऊन त्यांना रोजगाराचे साधन उपलब्ध व्हावे म्हणून या आदिवासी शेतकर्यांना ही फळझाडे वाटप करण्यात आली.
गेल्या 17 वर्षा पासून लाईट ऑफ लाईफ ट्रस्ट शिक्षण, आरोग्य, कृषी संवर्धन तसेच ग्रामीण भागातील महिला व बेरोजगार तरुणांना उपजीविका प्रशिक्षणाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करण्यासाठी विविध प्रकल्पाच्या माधमातून कार्यरत आहे. त्याचाच एक भाग म्हणून लाईट ऑफ लाईफ ट्रस्टच्या जागृती प्रकल्पाच्या माध्यमातून 19 ै ते 23 जुलै या कालावधीमध्ये 24 गावांतील 600 शेतकर्यांना 25 हजार 500 फळ झाडांचे त्यांच्या गावात जाऊन वाटप केले.
या फळझाडांच्या वाटपाच्या मोहिमेमध्ये पोंड्याचीवाडी गावामध्ये ऑल कार्गो लॉजिस्टिक कंपनीचे सीएसआर. प्रमुख डॉ. निरतन शेंडे आणि व्यवस्थापक नितीन कांबळे,प्रकल्प व्यवस्थापक गौतम कनोजे, कृषी अधिकारी कन्हैया सोमणे, तसेच कृषी सहाय्यक सुरज आगिवले, दशरथ नाईक उपस्थित होते. या उपक्रमात ऑल कार्गो कंपनीचे 22 वरिष्ठ कर्मचारी पोंड्याचीवाडी गावात झाडे वाटप करण्यासाठी स्वयंसेवक म्हणून आले होते. या 22 स्वयंसेवकांनी शेतकर्यांच्या शेतामध्ये जाऊन वृक्षारोपण केले. त्यानंतर या 22 स्वयंसेवकांनी तिवरे येथील लाईट ऑफ लाईट ट्रस्टच्या जागृती प्रकल्प, जीवन आशा कम्युनिटी सेंटरला भेट देऊन संपूर्ण प्रकल्प समजून घेतला.
तीनघर ठाकूरवाडी, बुरुंजवाडी, दांडवाडी, नावंढेवाडी, नागीरेवाडी, बागवाडा, रजपे कातकरवाडी, पाचखडकवाडी, जामरूग बिडवाडी, वांगणेवाडी, जामरूग ठाकूरवाडी, वनेवाडी, आंबेवाडी, ताडवाडी, भिलवले ठाकूरवाडी, वावरले, नसरापूरवाडी, रामवाडी, पोंड्याचीवाडी, कामतवाडी, चिंचवाडी, कोशानेवाडी, भूतीवलीवाडी, कोल्हारवाडी या वाड्यांचा यामध्ये समावेश होता.