| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत येथील आदिवासी आणि ग्रामीण भागात कार्य करणाऱ्या लाईट ऑफ लाईफ ट्रस्ट, फिरता दवाखाना युनिट आणि चिल्ड्रन्स होप इंडिया यांच्या माध्यमातून कर्जत तालुक्यातील दुर्गम भागांतील नागरिकांसाठी आरोग्यसेवा तसेच, विविध आरोग्य विषयक विषयांवर मार्गदर्शन शिबिरे आयोजित करत आहे. याच उपक्रमांतर्गत राष्ट्रीय पोषण महिना साजरा करण्यात येतो आणि यावर्षीही युनिटने अनेक शाळांमध्ये मुलांसाठी आणि पालकांसाठी पोषण विषयक जनजागृती उपक्रम राबवले.
रायगड जिल्हा परिषदेच्या विविध शाळांमध्ये तसेच लाईट ऑफ लाईफ ट्रस्टच्या कर्जत येथील सेंटरमध्ये महिला विद्यार्थ्यांसाठी पोषण विषयक मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते. यामध्ये प्रामुख्याने पौष्टिक आहार या विषयावर पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनमध्ये पौष्टिक घटकांची ओळख, कर्बोदके, जीवनसत्त्व, खनिजे, प्रोटीनचे महत्त्व आणि अन्न पचनासाठी व चांगल्या आरोग्यासाठी पाणी किती महत्त्वाचे आहे अशा सहा घटकांची माहिती देण्यात आली. त्याचबरोबर पौष्टिक आहारावर आधारित व्हिडिओचेसुद्धा सादरीकरण करून मार्गदर्शन करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये सहभाग वाढावा यासाठी बालक-पालक पौष्टिक भेळ स्पर्धा देखील आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्याला मल्टिव्हिटॅमिन सिरप पारितोषिक म्हणून देण्यात आले. या कार्यक्रमामध्ये वैद्यकीय अधिकारी डॉ. नेहा सोनावळे तसेच केशव कवठे,सारिका वेहले,सुरज भिंडेरे, यांनी शाळा शाळांमध्ये जाऊन पोषण माह बद्दल जनजागृती करण्याचे कार्य केले.







