| उरण | वार्ताहर |
उरण तालुक्यातील दिघोडे गावात चिकन शोरमा खाल्ल्याने 42 मुलांना विषबाधा झाली आहे. उरणमध्ये अनेक ठिकाणी शोरमा, चिकन आणि चायनिज दुकानांचा सुळसुळाट झाला आहे. यामधील बहुतांश दुकानदारांकडे ग्रामपंचायतसह इतर कोणत्याही अस्थापनाचा व्यवसाय परवाना व फूड परवाना नसून ते बेकायदेशीर व्यवसाय करीत आहेत. अनेक दुकानात शिळे चिकन मटण विक्री केले जात असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उद्भवत आहे. त्यामुळे अशा विनापरवाना बेकायदेशीर आणि शिळे चिकन मटण विक्री करणार्या दुकानदारांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
सर्वत्र चायनीजची दुकाने आणि चिकन मटण खाणार्यांची संख्या वाढल्याने चिकन व मटणाला मागणी जास्त वाढली आहे. त्यामुळे चिकन-मटण दुकानदार मुंबई अथवा नवी मुंबईतून काही दिवस राहीलेला बकरी व बोकडाचे मास, मुंडी, चिकनचे कटपीस, कलेजी-पेठा, सडकी चामडी आदी माल अत्यंत कमी किमतीत आणून तिपटीने ताज्या मालामध्ये मिक्स करून सरास विक्री करीत आहेत. सदरचा माल हॉटेल, शोरमा व चायनिजवाल्यांना कमी दरात विकला जातो. या शिळे चिकन मटणामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उद्भवत आहे. चिकन व मटण शॉपवाल्यांना मुंबई व नवी मुंबई येथून सकाळच्या प्रहरी पॅकबंद पिशवीतून हा माल येतो. उरणमध्ये विनापरवाना बेकायदेशिर चिकन मटनाची विक्री करणार्या विक्रेत्यावर कायदेशीर करवाई करुन ते कायम स्वरूपी बंद करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.