| उरण | प्रतिनिधी |
वातावरणातील बदल त्यात वाढत्या उष्णतेमुळे सध्या लहान मुलांना ताप, सर्दी-खोकला, घसादुखी, पोटदुखी, जुलाब-उलट्या यासारख्या आजारांचा सामना करावा लागत आहे. उष्णते बरोबरच बर्फ घातलेली पेये प्यायल्यामुळे आणि उघड्यावरचे पदार्थ खाल्ल्याने या प्रकारच्या समस्या वाढल्याचे निरीक्षण बालरोग तज्ज्ञांनी नोंदविले आहे. बर्फ आणि अस्वच्छ पाण्यामुळे मुलांमध्ये आरोग्याच्या समस्या वाढू शकतात, त्यामुळे काळजी घेण्याचा सल्ला सध्या रुग्णालयातील डॉक्टरांकडून दिला जात आहे.
उरण व पनवेल परिसरात मोठ्या प्रमाणात औद्योगिकीकरण आणि शहरीकरण वाढत आहे. त्यामुळे प्रदुषणात झपाट्याने वाढ होत असून वातावरणातील बदलामुळे दिवसेंदिवस उष्णतेचे प्रमाण वाढले जात आहे. त्यामुळे श्वसनविकार, ॲलर्जी आणि तापाच्या रुग्णांध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्यात उघड्यावरचे पदार्थ, अस्वच्छता, अशुद्ध पाणी, बर्फाचे पदार्थ अशा एक ना इतर कारणांमुळे सध्या लहान मुलांना ताप, सर्दी-खोकला, घसादुखी, पोटदुखी, जुलाब-उलट्या यासारख्या आजारांचा सामना करावा लागत आहे. अशा आजाराने त्रस्त झाली लहान मुले सध्या उरण, पनवेल तालुक्यातील अनेक रुग्णालयात उपचारासाठी दाखल होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यात उरण तालुक्यातील काही गावांमध्ये वाढत्या घाणीच्या साम्राज्यामुळे व वाढत्या डासांच्या प्रादुर्भावामुळे मलेरिया आणि डेंग्यूचे रुग्ण ही खाजगी रुग्णालयात उपचार करुन घेत असल्याचे दिसून येत आहे.







