राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धेत नागोठण्यातील मुलांची बाजी

पाचगणी येथील स्पर्धा उत्साहात संपन्न

| नागोठणे | वार्ताहर |

महाराष्ट्र अबॅकस असोसिएशनच्या वतीने पांचगणी-महाबळेश्वर (जि. सातारा) येथील विद्यानिकेतन स्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये नुकत्याच संपन्न झालेल्या राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धेत नागोठण्यातील मुलांनी अनेक बक्षिसांची लयलूट करीत बाजी मारली आहे. यामध्ये मोनालिसा नायक व कुशाग्र कुतंल यांनी चॅम्पियन ऑफ चॅम्पियन किताब मिळविला. तसेच नविश गाऊंडर याने प्रथम उपविजेता, बानुसरी गाऊंडर याने द्वितीय उपविजेता, तर स्वराज दळवी, जय चव्हाण, केयान सुमरा, हसनेन सुमरा व शुभ्रा शिंदे यांनी तृतीय उपविजेता पुरस्कार मिळविला आहे. राजश्री अबॅकस सेन्टरच्या संचालिका राजश्री बोलके व शिक्षिका सुरेखा पाटील यांचे मार्गदर्शन मुलांना लाभले.

महाराष्ट्र अबॅकस असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय अबॅकस व वेदिक गणित स्पर्धेत महाराष्ट्रातील 16 जिल्ह्यांतून विविध अबॅकस केंद्रातील एकूण 371 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यात प्रामुख्याने यश ग्रुप अबॅकस वाई, के.बी. अबॅकस नांदेड, दिशा अबॅकस महाड, राजश्री लर्निंग सेंटर नागोठणे व खारघर, युके अबॅकस जळगाव व पुणे, चाईल्ड वर्ल्ड अबॅकस नागपूर, मास्टर मॅथ माइंड अकॅडमी पुणे, समर्थ अबॅकस सातारा, ब्रेनली अकॅडमी बुलढाणा, वेंकटेश्वारा मॅथ्स लॅब अकॅडमी सांगली, ब्रेन पॉवर अबॅकस पुणे या अबॅकस केंद्रांचा सहभाग होता. या स्पर्धेतील बेस्ट सेंटर अवार्ड यश अबॅकस ग्रुप वाईच्या शिफा आतार व युके अबॅकस जळगावच्या कविता महाजन यांना मिळाला.

या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ शिवसेनेचे सातारा जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव, वाईतील ब्लॉसम स्कूलचे प्रा. शिवाजी शिंदे, वाईचे पोलीस उपधीक्षक बाळासाहेब भालचिम, विद्यानिकेतन स्कूलच्या मुख्याध्यापिका भारती विरामने, पत्रकार ॲड. महेश पवार यांच्या हस्ते संपन्न झाला. ही स्पर्धा यशस्वीपणे पार पडण्यासाठी महाराष्ट्र अबॅकस असोसिएशनच्या शुभांगी हेडाव, नागपूर, उमेश महाजन, जाळगाव, राजश्री बोलके, खारघर-नवी मुंबई, शिफा आतार व वासिम आतार, वाई, उमेश महाजन, भुसावळ या सदस्यांनी मेहनत घेतली. संपूर्ण स्पर्धेचे व पारितोषिक वितरण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नागपूर येथील अभिजित मुळ्ये यांनी केले.

Exit mobile version