चिन्मय सुतारची ऐतिहासिक खेळी

| मुंबई | प्रतिनिधी |

रणजी चषकाच्या दुसऱ्या फेरीतील सामन्यात मिझोरामकडून खेळणाऱ्या चिन्मय सुतारने ऐतिहासिक खेळी साकारली. त्याने नागालँडविरुद्ध नाबाद 400 धावा फटकावल्या. रणजी चषकाच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा तो दुसराच फलंदाज ठरला आहे. 77 वर्षांनी रणजी चषकात एका डावात एकाच फलंदाजाने 400 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत.

रणजी चषकाच्या 92 वर्षांच्या इतिहासात अशी कामगिरी फक्त दुसऱ्यांदा घडली आहे. याआधी बीबी निंबाळकर यांनी रणजी चषकाच्या एका डावात 400 धावा करण्याचा पराक्रम केला होता. 1948-49मध्ये काठियावाडविरुद्ध महाराष्ट्राकडून खेळताना नाबाद 443 धावा केल्या होत्या. यावेळी चिन्मय सुतारने सुरुवातीला संयमी फलंदाजी केली; मात्र, नंतर फटकेबाजी करत धावा वसूल केल्या. त्याने 6 व्या गड्यासाठी 168 धावांची भागिदारी केली. मिझोरामचे 9 गडी बाद झाल्यानंतर शेवटच्या गड्यासोबतही चांगली भागिदारी करत 400 धावांचा टप्पा गाठत विक्रम नोंदवला. क्रिकेटचं बाळकडू चिन्मयला घरातूनच मिळाले आहे. त्याच्या वडिलांनीही क्रिकेटमध्ये चमक दाखवली होती. राजेश सुतार हे 1990च्या दशकात मुंबई क्रिकेटमध्ये षटकार मारण्यासाठी ओळखले जात होते. मुंबईकडून 7 रणजी चषकातील सामने आणि 30 लिस्ट ए सामने खेळले आहेत. मुंबईकडून ते 1998मध्ये ऑस्ट्रेलियाविरद्ध सामन्यात खेळले होते. तेव्हा स्टीव्ह वॉ आणि शेन वॉर्नच्या संघाला हरवले होते.

Exit mobile version