कापडे खुर्दच्या चिंतामणी बावळेकरांचा अवघाची संसार

। पोलादपूर । शैलेश पालकर ।
समाजातील एकत्र कुटुंब पद्धतीचा र्‍हास होत असतानाच कापडे खुर्दच्या शंभरी पार केलेल्या चिंतामणी बाळकेकर यानी मात्र दोन बायकांसह सुखाने संसार करीत एकूण 22 अपत्यांचे जन्मदाते होण्याचा पराक्रम केला आहे.सध्या त्यांच्या परिवारात थोडी थोडकी नव्हेत तर दीडशेहून अधिकजण सुखाने नांदत असल्याचे दिसत आहे. चिंतामणी बावळेकरांच्या 22 मुलांपैकी पाच जण या ना त्या कारणाने दगावली तरी दोन बायकांसह सात मुली आणि दहा मुले अद्याप हयात आहेत असताना चिंतामणी बावळेकरांचा परिवार प्रपंच वाढत राहिला. पंतवंडं अन् नातवंडं अगदी घरभर आणि या सर्व प्रपंचाची ख्याती सर्वदूर पसरली आहे.


बावळेकरांच्या दोन्ही बायका एकमेकींच्या सख्ख्या बहिणी. एकीचे नांव भागाबाई तर दुसरीचे चंद्राबाई. भागाबाई गरोदर असताना पाहुणी आलेली विवाहित मेहुणी चंद्राबाई हिचे पती नोकरीनिमित्त तिच्यापासून दूर राहात असत. तिला मूलबाळ नव्हते. बावळेकरांनी तिलाही पत्नीप्रमाणे नांदविले आणि संसार दुहेरी वाढू लागला. दोन्ही बायका सख्ख्या बहिणी असल्यामुळे वाद झाला नाही. दोघींनाही नांदविण्यास बावळेकर सक्षम असल्याने संसारवेलीवर जणू एकामागून एक असा मुलांचा बहरच आला. कधी भागाबाई तर कधी चंद्राबाई अशी बाळ-बाळंतीणीची चढाओढ सुरू झाली. भागाबाईला विठोबा, लक्ष्मण, सुमन, सखुबाई, सुशिला, सखाराम, पांडुरंग तर चंद्राबाईला दत्ता, अशोक, चंद्रकांत, राजू, चंद्रु, तुकाराम, हौसी, मंदा, वासंती, आणि नंदा अशा सतरा अपत्यांचे पिता चिंतामणी झाले. पाच मुले बाळंतपणानंतर काही महिन्यांत दगावली पण बावळेकरांचे घरच बालदरबार असल्याने निवर्तलेल्या मुलाचे दु:ख करण्यास फुरसत नसे.


चिंतामणी बावळेकर कुटूंबाची चिंता वाहताना जरी चेहर्‍यावर हास्य आणत असले तरी बावीस मुलांचा बाप होण्याच्या या पराक्रमाची कोणीतरी दखल घेईल, नांव होईल, कोणी पैसा देईल, ही आशा अद्याप पूर्ण होत नसल्याची खंतही चिंतामणी बावळेकर यांना सतावतेय. लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड असो वा गिनीज बुक कोठेतरी आपली दखल घेतली जाईल,या अपेक्षेने बावळेकरांनी आपल्या सहाफूटी देहाला सुहास्यवदन मुद्रेत कॅमेर्‍यासमोर आणले. पोलादपूर तालुक्यातील सर्वात जास्त चर्चेतील कुटूंब आणि व्यक्तीमत्व असलेल्या चिंतोबांचे वय आता शंभरीपार चालले असून पंतवंडं, नातवंड आणि मुलं, मुली, जावई, सुना असा परिवार तब्बल दीडशतकी झाला आहे. 2021 वर्ष सरताना चिंतोबांच्या एका नातीचे लग्न लागले त्यावेळी चिंतोबांनी सहकुटूंब सहपरिवार फोटो काढून खुशमिजाज व्यक्तीमत्व कायम असल्याची जाणीव करून दिली.

Exit mobile version