| पोलादपूर | प्रतिनिधी |
पोलादपूर तालुक्यात पंचतारांकित एमआयडीसी उभारण्याच्या हालचाली पुन्हा सुरु झालेल्या आहेत. सावित्री नदीच्या पूर्वेकडील बाजूला असलेल्या जमिनींवर पंचतारांकित एमआयडीसी उभारण्यासाठी आ. प्रवीण दरेकर यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांना स्वत: पत्राद्वारे आवाहन केले. या अनुषंगाने सामंत यांनी तुर्भे खुर्द, दिवील, कापडे, रानवडी परिसरात जमिनीसाठी ग्रामसभांचे आयोजन करून अनुकुलता प्राप्त करण्यासंदर्भात स्थानिकांसोबत चर्चा करण्याचे आदेश तुर्भे खुर्दच्या सरपंचांना दिले आहेत.
2009-10 दरम्यान महाडचे माजी आमदार माणिकराव जगताप यांनी पोलादपूरचे तत्कालीन सभापती दिलीप भागवत यांच्या मागणीपत्रावरून तत्कालीन उद्योगमंत्री नारायण राणे यांच्याकडे पोलादपूर तालुक्यासाठी तुर्भे, लोहारे, वझरवाडी, तुर्भे खोंडा, तुर्भे बुद्रुक, तुर्भे खुर्द अशा परिसरात सावित्री नदीच्या पुर्वेला मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाला समांतर मिनी एमआयडीसी सुरू करण्यासंदर्भात निवेदन दिले.
यावर्षी आ.प्रवीण दरेकर यांनी पोलादपूर तालुक्यात पंचतारांकित एमआयडीसी सुरू करण्याच्या केलेल्या प्रयत्नांची माहिती देऊन रोजगारनिर्मिती करण्यासंदर्भात पंचतारांकित एमआयडीसीची मागणी केली आहे. या पत्राच्या अनुषंगाने उद्योगमंत्री सामंत यांनी एमआयडीसीच्या पत्राद्वारे पोलादपूर तालुक्यातील तुर्भे खुर्द व अन्य ग्रामपंचायतीच्या सरपंचांना विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यास कळविले आहे. यानंतर विकासाकरीता देय क्षेत्राबाबत एमआयडीसी कार्यालयाला अवगत केल्यानंतर स्थळपाहणीसाठी एमआयडीसी कार्यालयाकडून दौरा करण्यात येईल तसेच या स्थळपाहणी दौऱ्यानंतर महामंडळाचे अधिकारी, स्थानिक प्रतिनिधी व लोकप्रतिनिधी यांच्यासोबत संयुक्त बैठक घेण्यात येईल, अशी माहिती या पत्राद्वारे देण्यात आली आहे.