। चिपळूण । प्रतिनिधी ।
राज्य परिवहन महामंडळाच्या चिपळूण आगाराला नव्या बसची प्रतीक्षा आहे. चिपळूण आगारातून 10 बसची मागणी करण्यात आली आहे; मात्र अजून एकही बस प्राप्त झालेली नाही.
राज्य परिवहन महामंडळाच्या अर्थात एसटीचे बीद्र प्रवाशांच्या सेवेसाठी असे आहे; परंतु एसटी महामंडळाच्या बसची तुटलेल्या खिडक्या, फाटक्या सीट व पावसाळ्याच्या दिवसांत गळक्या छतामधून टपकणारे पावसाचे पाणी अशा खिळखिळ्या बसेस प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने अनेक योजना जाहीर केल्या आहेत. त्यामुळे एसटीकडे प्रवाशांचा कल वाढला आहे; परंतु प्रवाशांच्या तुलनेत बसची संख्या कमी आहे. त्यामुळे अनेक मार्गांवरील फेर्या वेळेवर सोडल्या जात नाहीत.
चिपळूण आगारात सध्या 105 बस आहेत. 10 नव्या बसची मागणी करण्यात आली आहे. चिपळूणपेक्षाही उत्पन्नात कमी असलेल्या गुहागर आगाराला पाच नव्या बस मिळाल्या; मात्र चिपळूण आगाराला अजून प्रतीक्षा आहे.
आम्ही दहा गाड्यांची मागणी केली आहे. पुढील आठवड्यात त्या येतील, अशी अपेक्षा आहे. नव्या गाड्या मिळाल्या की, प्रवासी एसटीकडे वळतील.
– दीपक चव्हाण, आगारप्रमुख चिपळूण