| रसायनी | राकेश खराडे |
पनवेल तालुक्यातील सुकापूर भगत वाडी येथील अनिकेत किसन भगत या वीस वर्षीय तरुणाचा मोरबे धरणात बुडून मृत्यू झाला. बुधवारी (दि.30) परीक्षा संपल्यावर तो मित्रांसबोत मोरबे धरण परिसरात फिरण्यासाठी आला होता. दरम्यान, सर्व मित्र पाण्याबाहेर असताना अनिकेत धरणात पोहण्यासाठी उतरला. दरम्यान, पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा दुर्दैवीरित्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. याबाबतची माहिती सोबतच्या मित्रांनी खालापूर पोलीस ठाण्यात दिली. त्यानंतर पोलीस निरीक्षक सचिन पवार, पोलीस उपनिरीक्षक विशाल पवार यांच्यासह दाखल झाले. त्यांनी तात्काळ अपघातग्रस्त टीमचे प्रमुख गुरुनाथ साठेलकर यांना माहिती दिली. अपघातग्रस्त टीमने शोधमोहीम राबवून सायंकाळी 5.45च्या दरम्यान अनिकेतचा मृतदेह शोधून काढला. अनिकेतचा मृतदेह वैद्यकीय तपासणीसाठी चौक ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक सचिन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विशाल पवार करीत आहेत.







