चिपळूणचा पूर थेट न्यायालयात

पाटबंधारे, हवामान, महसूलविरोधात भरणार खटला
। रत्नागिरी । वृत्तसंस्था ।
चिपळूणमधील पुराचा मुद्दा आता थेट न्यायालयात पोहचणार आहे. चिपळूणमध्ये आलेल्या पुरासाठी पाटबंधारे विभागाने निसर्गालाच जबाबदार धरलेलं असलं, तरी या आपत्तीनंतर नगरपालिकेने पाटबंधारे खातं, हवामान विभाग आणि महसूल विभागाला न्यायालयात खेचायचं ठरवलं आहे. चिपळूण नगरपालिकेच्या सर्वसाधरण सभेत हा निर्णय झाला असल्याची माहिती समोर आली आहे. सर्व अधिकार वापरत संबंधित विभागांना नोटीस पाठवू, असं चिपळूणच्या नगराध्यक्षा खेराडे यांनी म्हटलं आहे.

चिपळूणमध्ये आलेल्या पुरानंतरची ही मोठी घडामोड म्हणावी लागणार आहे. कारण, चिपळूण नगरपालिका आता महसूल विभाग, पाटबंधारे विभाग व हवामान विभाग यांच्या विरोधात न्यायालयात जाण्याची तयारी करत आहे. 5 ऑगस्ट रोजी यासंदर्भातील ठराव झालेला असून, हा निर्णय घेतला गेला आहे.
चिपळूणच्या नगराध्यक्षा खेराडे यांनी वृत्ताला दुजोरा दिलेला आहे. महापुराबाबतची कल्पना हवामान विभाग व पाटबंधारे विभागाकडून दिली गेली पाहिजे होती; परंतु ती दिली गेलेली नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. महसूल विभागाकडून वेळेत पंचनामे होणं अपेक्षित होतं, ते न झाल्याने स्थानिका नागरिकांसह व्यापार्‍यांमध्ये नाराजी दिसून येत आहे. नागरिकांचं व शेतीचंदेखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे. कृषी विभागाकडूनदेखील अपेक्षित असलेली कार्यवाही झालेली नाही. या सर्व गोष्टींमुळे आम्ही याविरोधात न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहोत. यासंदर्भातील ठराव आम्ही 5 ऑगस्टच्या सर्वसाधरण सभेत संमत केलेला आहे. त्याबाबत तातडीने सभा घेतली गेली आहे, अशी माहिती नगराध्यक्षा खेराडे यांनी दिली आहे.

Exit mobile version