चिपळूण बचाव समितीचे उपोषण स्थगित

बहुतांश मागण्याही मान्य, 80 टक्के यंत्रणा कामाला
। चिपळूण । वृत्तसंस्था ।
चिपळूण येथील प्रांत कार्यालयासमोर गेले 28 दिवस सुरू असलेले येथील चिपळूण बचाव समितीचे साखळी उपोषण अखेर स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. वाशिष्ठी नदीतील गाळ काढण्याच्या कामाला गती मिळाली असून, सुमारे 80 टक्के यंत्रणा येथे कामाला लागली आहे. अन्य बहुतांश मागण्याही मान्य झाल्याचे लेखी पत्र प्रशासनाकडून सोमवारी (ता. 3) मिळणार आहे. त्यामुळे तूर्तास हे उपोषण स्थगित ठेवण्याचा निर्णय समितीने घेतल्याची घोषणा रविवारी (ता. 3) पत्रकार परिषदेत केली.
चिपळुणात 22 जुलैला आलेल्या महापुराला वाशिष्ठी नदीतील गाळ हेच मुख्य कारण असून प्रथम वाशिष्ठी गाळ मुक्त करा. लाल व निळी पूररेषा रद्द करा. यासह एकूण 10 मागण्या घेऊन चिपळूण बचाव समितीने 6 डिसेंबरपासून साखळी उपोषण सुरू केले होते. या उपोषणाची दखल राज्य सरकारने घेतली. याबाबत पत्रकार परिषदेत माहिती देताना बचाव समितीचे अरुण भोजने म्हणाले, चिपळूण बचाव समिती आणि समस्त चिपळूणवासीयांनी उभारलेल्या या लढ्याला निर्णायक यश मिळाले आहे.
गाळ काढण्याच्या कामाला गती मिळाली आहे. सुमारे 80 टक्के यंत्रसामुग्री वाशिष्ठी नदी किनारी दाखल झाली असून, गोवळकोट ते बहादूरशेख नाका या पहिल्या टप्प्यातील गाळ काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. जलसंपदाचे अधीक्षक अभियंता, मुख्य अभियंता, स्थानिक अधिकारी चिपळूणमध्ये ठाण मांडून आहेत. त्याचबरोबर चिपळूण बचाव समिती रोज कामाचा आढावा घेत अधिकार्‍यांशी चर्चा करत आहे. गाळ काढण्यासाठी संपूर्ण निधी देण्याची ग्वाही सरकारने दिली आहे. गाळ काढल्यानंतर पुन्हा सर्वेक्षण करून लाल, निळ्या पूर रेषेबाबत निर्णय घेण्याचे आश्‍वासन देण्यात आले आहे. पर्जन्यमापक अत्याधुनिक व स्वयंचलित असावे, ही मागणीही मान्य करण्यात आली आहे.
नदीचे सर्वेक्षण व गाळ काढण्याचे नियोजन याचा आराखडा तयार करण्यासाठी सरकारने 25 लाख रुपये दिले आहेत. हे समस्त चिपळूणवासीयांच्या लढ्याचे यश आहे. या संपूर्ण कामाबाबत मुख्य अभियंता विजय घोगरे व तहसीलदार जयराज सूर्यवंशी, अधीक्षक अभियंता यांच्याशी चर्चा झाली असून, त्यांनी उपोषण मागे घेण्याची विनंती केली. सोमवारी (ता. 3) लेखी पत्र मुख्य अभियंता घोगरे समितीला देणार आहेत. त्यानंतर समितीची बैठक होईल व दुपारनंतर उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला जाईल, असे शिरीष काटकर यांनी सांगितले. या वेळी शहानवाज शाह, किशोर रेडीज, महेंद्र कासेकर, बापू काणे, उदय ओतारी, सतीश कदम, समीर जानवलकर आदी उपस्थित होते.

पाण्याबाबत आगाऊ सूचना
विशेष म्हणजे अतिवृष्टीवेळी धरणातून पाणी सोडताना समिती आणि स्थानिक प्रशासनाला पूर्ण विश्‍वासात घेऊन आगाऊ सूचना देतानाच पाणी सोडण्याच्या वेळा निश्‍चित केल्या जातील, अशी स्पष्ट ग्वाही देण्यात आली आहे.

Exit mobile version