गावठाण विस्तार करण्याची चिर्ले ग्रामस्थांची मागणी

। जेएनपीटी । वार्ताहर ।
ग्रुप ग्रामपंचायत चिरलेमधील चिरले गावाचा गावठाण विस्तार करण्यात यावा, अशी मागणी चिर्ले ग्रामस्थांनी जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे. तसा ग्रामपंचायतीचा ठराव जिल्हाधिकार्‍यांना दिला आहे.
मागील 70 वर्षे चिरले गावाचा गावठाण विस्तार झालाच नाही. वाढती लोकसंख्या व कुटुंबसंख्येप्रमाणे नियमानुसार दर दहा वर्षांनी 200 मीटर गावठाण विस्तार होणे कायद्यानुसार आवश्यक होते. चिरले गावाचा मूळ गावठाक्षेत्र 70 वर्षांपूर्वीचा म्हणजे फक्त 5 एकर क्षेत्रात आहे. वास्तविक, दर दहा वर्षांनी 200 मीटरप्रमाणे किमान पाच वेळा तरी गावठाण विस्तार होणे आवश्यक होता; परंतु तो झालाच नाही.
आज चिरले गाव व साईनगरवाडीत घरांची संख्या 830 एवढी आहे. तर, चिरले गाव व साईनगरवाडीतील लोकसंख्या जनगणनेनुसार 2818 एवढी आहे. म्हणूनच चिरले ग्रामस्थ व सर्वपक्षीय पदाधिकार्‍यांनी एकत्रित बैठका घेऊन गावठाण विस्ताराचा प्रस्ताव जिल्हाधिकारी रायगड यांना देण्यासाठी एकमुखाने निर्णय घेण्यात आला. याबाबत पाठपुरावा करण्यासाठी गावपातळीवर संदेश ठाकूर, सुरेश ठाकूर आणि चंद्रकांत मढवी यांची समिती बनविण्यात आली आहे.

Exit mobile version