। चिरनेर । प्रतिनिधी ।
तीर्थक्षेत्र चिरनेर नगरीत संकष्टी चतुर्थीनिमित्त रविवारी (दि.20) भाविकांनी महागणपतीच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच रांगा लावल्या होत्या. काही भाविकांनी पायी वारी करीत मंदिर गाठत श्रींचे दर्शन घेतले. यावेळी रायगड, नवी मुंबईसह हजारोंच्या संख्येने भाविक दाखल झाले होते. विशेषतः यावेळी छोट्या-मोठ्या व्यवसायिकांचा व्यवसाय देखील तेजीत होता.
यावेळी महागणती मंदिर परिसरातील दुकाने ग्राहकांनी गजबजली होती. यामुळे शोभिवंत वस्तूंची दुकाने, हॉटेल, नारळ, हार, फुले, मातीची भांडी, पापड, कडधान्य विक्रेते, प्रसाद व पेढेवाले सुखावले होते. तसेच, महागणपती मंदिर परिसरात अनेक आदिवासी व आगरी समाजाच्या महिला विक्रेत्या फळे, कंदमुळे व रानमेवा विक्री करण्यासाठी आल्या होत्या. बाप्पाचा प्रसाद म्हणून मंदिरात येणारे भाविक येथून आवर्जून हा ग्रामीण रानमेवा खरेदी करत होते. भाविकांच्या सोयीसाठी श्री गणपती देवस्थानातर्फे चोख व्यवस्था करण्यात आली होती.