। उरण । वार्ताहर ।
सेंद्रिय खत आणि नैसर्गिक पद्धतीने पिकणार्या चविष्ट आणि गोड वालांना भौगोलिक मानांकन मिळावे, अशी मागणी चिरनेरच्या शेतकर्यांनी केली आहे. यासाठी चार वर्षांपूर्वी कृषी विभागाकडून हा प्रस्ताव देण्यात आला आहे. मात्र, त्याची दखल घेण्यात येत नसल्यामुळे शेतकर्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
चिरनेरचे शेतकरी अतिशय कष्टाने आणि नेटाने सेंद्रिय खतांचा आणि नैर्गिक पद्धतीचा वापर करून अनेक वर्षे उत्तम प्रतीच्या वालाचे पीक घेत आहेत. भात शेतीनंतर हे पीक घेतले जाते. थंडीच्या दिवसांत पडणार्या दवावर तसेच शेणखत आणि शेतातील पालापाचोळा यांचा वापर करून हे पीक घेतले जाते. या पिकांचे जंगलातील प्राण्यांपासून संरक्षण करण्यासाठी शेतकर्यांना रात्री जागवाव्या लागतात.
चिरनेरमधील वालाचे पीक हे पारंपरिक आहे. त्याचे जतन करण्याचे काम येथील सेंद्रिय शेती गटाने केले आहे. त्यांच्या माध्यमातून वालांना भौगोलिक मानांकन मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. चार वर्षांपूर्वी दापोली येथील बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाकडे या संबंधीचा प्रस्ताव उरणच्या कृषी विभागाकडून पाठविण्यात आला आहे. त्यानंतर याचा पाठपुरावा ही करण्यात आला आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष केले जात असल्याची माहिती चिरनेर येथील प्रयोगशील शेतकरी प्रफुल्ल खारपाटील यांनी दिली आहे.
भौगोलिक मानांकनासाठी कृषी विद्यापीठाकडून पिकाची तपासणी करून संशोधना अंती त्याचा अहवाल तयार केला जातो त्यानंतर भौगोलिक मानांकनाची प्रक्रिया पूर्ण केली जाते. मात्र अर्ज करून ही कृषी विद्यापीठाकडून दखल घेतलेली नाही. चिरनेरच्या वालाला भौगोलिक मानांकन मिळावे यासाठी प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. मात्र त्याबद्दलची माहिती घेऊन सांगतो असे मत उरणच्या तालुका कृषी अधिकारी अर्चना सुळ यांनी दिली आहे.
अडीचशे रुपये किलोचा दर
चिरनेरच्या सेंद्रीय वालाला बाजारात इतर वालांच्या तुलनेत अधिकचा दर मिळत आहे. इतर वालाना 100 ते 125 दर मिळत असताना चिरनेरच्या वालांना मात्र किलोला 250 रुपयांचा दर मिळत आहे. चिरनेरचा वाल हा चविष्ट असल्याने वालाच्या शेंगाची पोपटी प्रसिद्ध आहे. त्यामुळे चिरनेर परिसरात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. भौगोलिक मानांकन मिळाल्यानंतर याचा शेतकर्यांना लाभ होणार आहे. त्यामुळे येथील शेतकर्यांची प्रतिष्ठा वाढून दरही वाढेल.