पाणलोट क्षेत्रात भराव टाकत नाल्यांची संरक्षण भिंत तोडण्याचा आरोप
| उरण प्रतिनिधी |
चिरनेर गावातील पूरस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी उभारण्यात आलेली नाल्यांची संरक्षण भिंत तोडण्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. नाल्यांच्या काठावर उभारण्यात आलेल्या युनी स्टोअर वल्डहाऊसिंग प्रकल्पाच्या व्यवस्थापनाने खाडीच्या मुखाजवळील पाणलोट क्षेत्रात दगड-मातीचा भराव टाकत संरक्षक भिंतीला धक्का दिल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे. यामुळे पुन्हा एकदा चिरनेर गावावर पुराचा धोका ओढावण्याची भीती व्यक्त होत आहे.
चिरनेर गावात दरवर्षी पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होत होती. सुमारे 200 ते 300 घरांमध्ये पाणी शिरून मोठी जीवित व वित्तहानी होत होती. या पार्श्वभूमीवर उरणचे आ. महेश बालदी यांच्या शिफारशीनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) मार्फत सुमारे पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. त्यानुसार सहा वर्षांपूर्वी नाल्यांच्या दोन्ही काठांवर मे. पी.पी. खारपाटील कंपनीमार्फत संरक्षण भिंत उभारण्यात आली होती.
या संरक्षण भिंतीमुळे पूराचे पाणी मूळ नाला पात्रात मर्यादित राहावे आणि गावात शिरू नये, हा उद्देश होता. मात्र, आता संबंधित वल्डहाऊसिंग प्रकल्पाने पाणलोट क्षेत्रातच भराव टाकत नाल्याच्या नैसर्गिक प्रवाहात हस्तक्षेप केल्याचे समोर आले आहे. संरक्षक भिंतीचा काही भाग तोडण्याचा प्रयत्न झाल्याने स्थानिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. पूरग्रस्त रहिवाशांच्या हिताचा विचार न करता प्रशासनाला न जुमानता हा प्रकार करण्यात आल्याचा आरोप होत आहे. खाडीच्या मुखाजवळील पाणलोट क्षेत्रात भराव टाकल्याने भविष्यात पावसाळ्यात पाण्याचा निचरा अडथळित होऊन गावात पुन्हा पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या गंभीर प्रकरणाकडे संबंधित प्रशासन व लोकप्रतिनिधी लक्ष देणार का, असा सवाल उपस्थित होत आहे. गावकऱ्यांच्या सुरक्षेसाठी उभारण्यात आलेल्या संरक्षण भिंतीचे नुकसान करणाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी आणि पाणलोट क्षेत्रातील भराव हटवावा, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.






