आरांशच्या कुटुंबियांचे चित्रलेखा पाटील यांच्याकडून सांत्वन

प्रशासनाच्या कारभाराबाबत तीव्र नाराजी

| अलिबाग | प्रतिनिधी |

अलिबाग तालुक्यातील बामणगाव-खारीकपाडा येथील आरांश ठाकूर या दोन वर्षाच्या बालकाचा दोन दिवसांपूर्वी दुर्दैवी मृत्यू झाला. शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी बुधवारी (दि.18) खारीकपाडा निवासस्थानी जाऊन आरांशच्या कुटूंबियांची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी त्यांना धीर देत शेतकरी कामगार पक्ष तुमच्या पाठीशी उभा असेल. रस्त्याच्या ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची शेकापने मागणी केलेली असून, कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळवून देण्यास पाठपुरावा केला जाईल, अशी ग्वाही चित्रलेखा पाटील यांनी दिली.

खेळताना फुगा गिळल्याने आरांश सुशील ठाकूर या एक वर्षे आठ महिन्याच्या बालकाचा सोमवारी (दि.16) दुपारी श्वास कोंडला. ही बाब त्याच्या आई-वडीलांच्या लक्षात आल्यावर त्याच्यावर तातडीने उपचार व्हावे, म्हणून जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. मिळेल, त्या वाहनाचा आधार घेत जिल्हा रुग्णालय गाठण्याचा प्रयत्न केला. मात्र, बेलकडे-कुरुळ मार्गावर सुरु असलेल्या रस्त्याच्या कामांमुळे 3 किलो मीटर अंतरावर दोन्ही बाजूने मोठी वाहतूक कोंडी झाली होती. या वाहतूक कोंडीतून मार्गच मिळत नव्हता. त्यामुळे पंधरा-वीस मिनिटांच्या अंतराकरिता जवळपास दोन तासांच्या प्रयत्नानंतर रुग्णालय गाठले. मात्र, जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी तपासून तो मृत झाल्याचे घोषित केले. आरांशच्या दुर्दैवी मृत्यूबाबत शेतकरी कामगार पक्षाच्या प्रवक्त्या चित्रलेखा पाटील ठेकेदारासह प्रशासनाच्या कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. दरम्यान, बुधवारी दुपारी खारीकपाडा येथे जाऊन आरांश ठाकूर यांच्या कुटूंबियांची भेट घेतली. आरांशच्या आई, वडीलांची विचारपूस करून त्यांना धीर दिला. यावेळी शेकाप ज्येष्ठ नेते अनिल पाटील, ग्रामपंचायतीचे माजी सदस्य सतिश भगत, अनंत थळे अमित थळे, प्रतिक खारकर, चंद्रकांत ठाकूर, अंकित ठाकूर आदी पदाधिकारी, कार्यकर्ते व आरांश ठाकूरचे आई-वडील उपस्थित होते.

Exit mobile version