शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा किलबिलाट

प्रवेशोत्सवात पालकांसह विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

। अलिबाग । प्रतिनिधी ।

ढोलताशाचा गजर, शिक्षकांनी केलेले औक्षण, गुलाबाच्या फुलांनी झालेले स्वागत, पहिल्याच दिवशी हातात मिळालेली नवी कोरी पुस्तके आणि त्यासोबतच गोड गोड खाऊचे वाटप अशा चैतन्यमयी वातावरणात दोन महिन्यांच्या प्रदीर्घ सुट्टीनंतर रायगड जिल्ह्यातील शाळा शनिवारी (दि. 15) पासून पुन्हा सुरू झाल्या आहेत. पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने वातावरण भारुन गेले होते. शिक्षकांची शाळेत येणार्‍या व नव्याने दाखल होणार्‍या विद्यार्थ्यांना रमविण्यासाठी सुरू असलेली धावपळ, आईबाबांना सोडवत नसल्याने विद्यार्थ्यांची होणारी घालमेल अशा वातावरणात आज शाळेची पहिली घंटा वाजली. प्रवेशोत्सवामध्ये विद्यार्थी, पालक, शिक्षक, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, सभासद मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

आजपासून 2024-25 या शैक्षणिक वर्षास प्रारंभ झाला. शाळेचा पहिलाच दिवस असल्याने सकाळपासून शाळांमध्ये विद्यार्थ्यांसह पालकांची प्रचंड गर्दी होती. विद्यार्थ्यांना शाळेची ओढ निर्माण व्हावी यासाठी त्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. मुलांना खाऊ देण्याबरोबरच मोफत पाठ्यपुस्तके वितरीत करण्यात आली. त्यामुळे एक वेगळा उत्साह विद्यार्थ्यांमध्ये दिसून आला. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील काही अधिकार्‍यांनी शाळांना भेटी दिल्या. विद्यार्थ्यांसह शिक्षक, शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकारी सदस्यांंचे प्रबोधन करीत जिल्हा परिषद शाळेचे महत्त्व पटवून दिले. जिल्ह्यातील काही शाळांमार्फत गावांमध्ये प्रभात फेरी काढण्यात आली. जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना पाठविण्याचे आवाहन या फेरीच्या मार्फत करण्यात आले. अनेक शाळांमध्ये माजी शिक्षक, माजी विद्यार्थ्यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांशी गप्पा मारल्या. शाळेचा पहिला दिवस चैतमन्य व उत्साहवर्धक वातावरणात पार पडला.

सीईओंनी साधला संवाद
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांनी अलिबाग तालुक्यातील पोयनाड येथील जिल्हा परिषद शाळेला भेट दिली. यावेळी नव्याने दाखल होणार्‍या शाळेतील विद्यार्थ्यांचे त्यांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांनी संवाद साधला, त्यांच्याशी गप्पागोष्टी करून मार्गदर्शन केले. दरम्यान, शाळेत विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकेदेखील वाटप करण्यात आली. यावेळी उपशिक्षणाधिकारी संतोष शेडगे, गटशिक्षणाधिकारी कृष्णा पिंगळा, माजी सरपंच भूषण चवरकर, शाळेचे मुख्याध्यापक विनायक पाटील, सेवानिवृत्त शिक्षक जनार्दन पाटील, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना मिळणार नवे शूज
रायगड जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढावी, विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद शाळेबाबत आकर्षण निर्माण व्हावे यासाठी प्राथमिक शिक्षण विभागामार्फत जिल्ह्यातील दोन हजार 643 शाळेतील एक लाख 389 विद्यार्थ्यांना मोफत शूज दिले जाणार आहेत. पहिली ते आठवीच्या प्रत्येक विद्यार्थ्यांमागे शूज आणि सॉक्ससाठी 170 प्रमाणे एक कोटी 70 लाख 66 हजार रुपयांचा खर्च केला जाणार असून, दोन दिवसात ते देण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली.
पहिल्या दिवशी गणवेश नाहीच
रायगड जिल्हा परिषदेच्या सुमारे अडीच हजार शाळा आहेत. या शाळेत शिकणार्‍या विद्यार्थ्यांना शिक्षण विभागाकडून नवे गणवेश दिले जाणार आहेत. शाळेत घालणार्‍या गणवेशाचा कापड उपलब्ध झाले आहे. महिला आर्थिक विकास महामंडळाकडून गणवेश दिले जाणार आहेत. तसेच स्काऊट गाईड्सच्या गणवेशासाठी 110 प्रमाणे शिलाई खर्च दिला जाणार आहे. शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून हा खर्च केला जाणार आहे. त्यासाठी शिक्षण विभागाकडून निधी वितरीत केला जाणार असल्याचे जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे. पहिल्या दिवशी गणवेश देण्याचे आश्‍वासन फोल ठरल्याचे दिसून आले.
एसटीअभावी पहिल्याच दिवशी शाळेला दांडी
सकाळी शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांनी तयारी केली. मात्र, एसटी बस न आल्याने विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी शाळेला दांडी मारावी लागली. उन्हाळी सुट्टीत शाळेच्या फेर्‍या बंद करण्यात आल्या होत्या. मात्र, शाळा सुरु झाल्याची माहिती असतानादेखील एसटी महामंडळ रायगड विभागाकडून पहिल्या दिवशी शाळेच्या फेर्‍या सोडल्या नाही. त्यामुळे काही विद्यार्थ्यांना शाळेत वेळेवर पोहोचता आले नाही, तर काही विद्यार्थ्यांनी शाळेत जाता आले नाही. एसटी महामंडळाच्या या भोंगळ कारभाराचा फटका विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर पहिल्याच दिवशी बसला.
साडेसतरा हजार नवे विद्यार्थी
रायगड जिल्ह्यात शाळा सुरू झाल्या आहेत. शाळा पूर्वतयारीचे नियोजन जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये करण्यात आले. सर्वेक्षणानुसार जिल्ह्यात नव्याने दाखल होणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या 17 हजार 529 इतकी आहे.
Exit mobile version