पाली तहसील कार्यालयावर धडक
| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
रायगडच्या सुधागड तालुक्यातील चिवे ग्रामपंचायत अंतर्गत येणार्या विभागातील शेकडो ग्रामस्थांनी मेलोरा इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीविरोधात विविध मागण्या आणि तक्रारी घेऊन पाली तहसिल कार्यालयावर मंगळवारी (दि.12) धडक दिली. यावेळी मेलोरा इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीकडून होत असलेले आंबा नदी पात्रातील अनधिकृत बांधकाम, अस्वच्छतेविरोधात शेकडो ग्रामस्थांनी रुद्रावतार दाखविला. सर्वसामान्यांना कायदा आणि श्रीमंताना फायदा असे फलक झळकावत मनमानी कारभार थांबवा, लोकप्रतिनिधी यांना सन्मानपूर्वक वागणूक द्या आणि संबंधितांवर जलद कारवाई करा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. शिवाय, येत्या आठ दिवसात प्रशासनाने संबंधितांवर योग्य ती कारवाई न केल्यास रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्याचा इशारा चिवे गावच्या आंदोलक ग्रामस्थांनी दिला.
मेलोरा इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीतील परप्रांतियांचे आंबा नदी जणू शौचालय बनले असून, ज्या नदीतून पिण्याच्या पाण्याचा स्रोत प्रवाहित होतो, तिथेच परप्रांतीय शौचास जात असल्याचा संताप ग्रामस्थांनी यावेळी व्यक्त केला. आम्हीही माणसे आहोत, आम्हाला ही मूलभूत हक्क अधिकार आहेत, त्यामुळे आता कुणाचीही दादागिरी, मुजोरी खपवून घेणार नाही असे यावेळी ठणकावण्यात आले. आक्रमक चिवे ग्रामस्थांनी पाली तहसील कार्यालयावर दमदार मोर्चा काढून आपल्या संतप्त भावनांना वाट मोकळी करून दिली.
यावेळी चिवे ग्रामपंचायत सरपंच रोहिदास सीताराम साजेकर, उपसरपंच अरविंद ठाकूर, ग्रामपंचायत सदस्य विजय शांताराम जाधव, नागेश साजेकर, सोनाली ठाकूर, निशा वाघमारे, नवशी मांडवकर, रंजना पवार, मनसे रायगड जिल्हा सचिव लताताई कळंबे, नथुराम वाघमारे, श्रीकांत ठोंबरे, आरिफ मणियार, प्रणाली शेठ, नरेश खाडे, भास्कर पार्टे, जगन्नाथ ठाकूर, चंद्रकांत ठाकूर, बळीराम जाधव, तुकाराम साजेकर, धोंडू साजेकर, हरिश्चंद्र ठाकूर, किरण साजेकर, मुकुंद जाधव, दत्तू ठाकूर, बाळकृष्ण ठाकूर, गणपत साजेकर, उद्देश चव्हाण, राकेश ठाकूर, अनिता ठाकूर, सुवर्णा ठाकूर, पिटी हिलम, सचिन हिलम, सुदाम जाधव, जगन्नाथ ठाकूर, संजय ठाकूर आदींसह चिवे ग्रामपंचायत परिसरातील शेकडो महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उत्तम कुंभार, तहसीलदार, पाली सुधागड
चिवे ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंच तसेच ग्रामस्थांनी दिलेल्या तक्रारी निवेदनाची गांभीर्यपूर्वक दखल घेऊन वस्तुस्थितीबाबत चौकशी केली जाईल, प्राप्त अहवालानुसार कारवाई केली जाईल.