चोरोंडे चॅलेंजर चषक 2024

राजा शिवछत्रपती महाराज किहीम अंतिम विजेता

| सोगांव | वार्ताहर |

अलिबाग तालुक्यातील चोरोंडे येथे चॅलेंजर चषक 2024 क्रिकेट स्पर्धांचे आयोजन जय हनुमान क्रीडा मंडळ चोरोंडे यांनी शुक्रवारी (दि.9) ते रविवारी(दि11) फेब्रुवारी रोजी चोरोंडे येथील क्रिकेट मैदानावर आयोजित करण्यात आली होती.

या स्पर्धेचे उद्घाटन मापगांव ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच अशोक नाईक, ग्रामपंचायत सदस्य विजय भगत, मापगाव ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य वसीम कुर, ग्रामपंचायत सदस्या स्नेहा रुत, जगन्नाथ पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेत एकूण 24 संघांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेला अजित घरत, सुरेंद्र राडे, नितीन अधिकारी, उल्हास अधिकारी व इतर ग्रामस्थांनी सदिच्छा भेट दिली.


अंतिम सामना राजा शिवछत्रपती महाराज किहीम संघ विरुद्ध गावदेवी मापगाव संघ यांच्यात झाला. अटीतटीच्या सामन्यात राजा शिवछत्रपती महाराज किहीम संघाने बाजी मारत प्रथम क्रमांक पटकावला, तर गावदेवी मापगाव संघाने द्वितीय क्रमांक पटकावला. तसेच तृतीय क्रमांक गुडलक क्रिकेट क्लब परहूर पाडा यांनी पटकावले.

स्पर्धेत उत्कृष्ट गोलंदाज गावदेवी मापगाव संघाचा नितेश राऊत तर उत्कृष्ट फलंदाज गुडलक परहूर पाडा संघाचा गणेश पाटील याला देण्यात आला. स्पर्धेचा मालिकावीर म्हणून राजा शिवछत्रपती महाराज किहीम संघाचा ऋषिकेश राऊत याचा सन्मान करण्यात आला. बक्षीस समारंभास मापगाव ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य वसीम कुर, सदस्य विजय भगत, सदस्या स्नेहा रुत, संतोष रुत, सामाजिक कार्यकर्ते जगदीश सावंत व इतर मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार व चषक देऊन गौरविण्यात आले.

यावेळी चोरोंडे पंचक्रोशीतील प्रतिष्ठित नागरिक व क्रिकेट प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्पर्धा अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी जय हनुमान क्रीडा मंडळ चोरोंडे संघाच्या सर्व खेळाडूंनी विशेष मेहनत घेतली. स्पर्धेत सूत्रसंचालन व समालोचन निखिल पडते व नदीम वाकनिस यांनी केले.

Exit mobile version