नाताळ हाऊसफुल्ल; मंदिरे-चर्चमध्ये भाविकांची गर्दी

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

विकेन्डला धरुन आलेला नाताळचा आनंद साजरा करण्यासाठी रायगडच्या सर्वच पर्यटनस्थळांवर रविवाऱी पर्यटकांची तुफान गर्दी दिसून आली. तसेच पाली, महड, साळाव, नांदगाव येथील मंदिरे, अलिबाग, पेण, पनवेल, खोपोली, कोर्लई येथील चर्चेसमध्येही भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. पर्यटकांच्या वाढत्या संख्येने छोटे, मोठे व्यावसायिक मात्र भलतेच तेजीत दिसून आले.


गेल्या दोन दिवसांपासून हवेतही कमालीचा गारवा निर्माण झाला आहे. त्यामुळे गुलाबी थंडीचा आनंद लुटण्याबरोबरच राहण्या-खाण्याचे दरात देखील मागील महिन्याच्या तुलनेत 10 ते 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे. सर्व ठिकाणी पर्यटकांची गर्दी आहे. यामुळे पर्यटनावर अवलंबुन असलेले हॉटेल व्यावसायिक, खानावळी, छोटे-मोठे दुकानदार, वाहतूकदार, राईड्सवाले यांची सध्या चलती आहे. पर्यटकांच्या वाहनांमुळे मुंबई गोवा महामार्ग, पाली खोपोली राज्य महामार्ग, मुंबई पुणे द्रुतगती मार्ग, मुंबई बैंगलोर महामार्ग आदी मार्गांवर गर्दी होत आहे. तर काही ठिकाणी वाहतूक कोंडी देखील पहायला मिळत आहे.


महडचा वरदविनायक आणि सुधागड तालुक्यातील पालीचा बल्लाळेश्‍वर, सध्या येथे भाविकांची दर्शनासाठी रीघ लागलेली होती. शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्यावर पर्यटक मोठया संख्येने येत आहेत.

मास्क वापरण्याचे आवाहन
नाताळ सुट्यांमध्ये पर्यटकांच्या संख्येत खूप वाढ होत आहे. 31 डिसेंबर पर्यंत गर्दी कायम राहील. पर्यटकांना सर्व प्रकारच्या सोयी-सुविधा योग्य दरात देण्यासाठी येथील व्यावसायिक सज्ज झाले आहेत. व्यावसायिकांचा व्यवसाय चांगला होत आहे. शिवाय महसूल देखील वाढत आहे. कोरोनाचा नवीन व्हेरियंट आल्याने पर्यटकांनी सुरक्षित अंतर ठेवून मास्क वापरावे आणि ग्रामपंचायतीस सहकार्य करावे, असे आवाहन हरिहरेश्‍वरचे सरपंच अमित खोत यांनी केले आहे.

नाताळ व नववर्षाच्या स्वागतासाठी देखील पर्यटकांची गर्दी प्रचंड वाढली आहे. अनेकांनी आगाऊ बुकिंग केले आहे. काही महिने मंदी होती मात्र आता खूप चांगला व्यवसाय होत आहे.

मनिष पाटील
चालक, माऊ रिसॉर्ट, दिवेआगर
Exit mobile version