समुद्र, मंदिरे, किल्ले, तीर्थक्षेत्र पाहण्यासाठी तोबा गर्दी
। पाली- बेणसे । वार्ताहर ।
कोकणाला 720 किमी लांबीचा विस्तृत समुद्रकिनारा लाभला आहे. येथील निसर्गरम्य व मनमोहक गारवा देणार्या स्थळांना आता रायगड जिल्ह्यातील पर्यटक मोठी पसंती देत आहेत. अलिबाग, मुरुड, जंजिरा, श्रीवर्धन, नागाव, हरिहरेश्वर हे सागरी किनारे व पर्यटनस्थळे पर्यटकांनी गजबजली आहेत. शनिवार व रविवार सलग लागून आलेल्या सुट्टयांनी पर्यटक हॉलिडे एन्जॉय करण्यासाठी बाहेर पडत आहेत. हापूस आंबे व ताजी मासळी साठी खवय्यांची मोठी पसंती दिसून येत आहे.
पुणे-मुंबईसह महाराष्ट्रातील निरनिराळ्या ठिकाणचे पर्यटक जिल्ह्यातील पर्यटनस्थळाकडे आले आहेत. जिल्ह्यातील विविध समुद्र किनारे व पर्यटन स्थळांवर गर्दी वाढली आहे. येथिल समुद्र किनारे, मंदिरे, ऐतिहासिक वास्तु, किल्ले, तीर्थक्षेत्र पाहण्यासाठी पर्यटकांचा ओघ वाढत आहे. यामुळे पर्यटनावर अवलंबून असलेले हॉटेल व लॉज व्यावसायिक, खानावळी, दुकानदार यांची सध्या खूप चलती आहे. राहण्या-खाण्याच्या दरात मागीलवर्षी पेक्षा वाढ झाली आहे. मात्र खराब रस्ते व वाहतूक कोंडीमुळे पर्यटकांची गैरसोय होत आहे. राहण्यासाठी साधी रूम 1200 ते 1600 रुपये आणि एसी रूम 2000 ते 2500 प्रति दोन व्यक्ती एक दिवसाचे भाडे आहे. ठिकाणांनुसार त्यात दर कमी जास्त होत आहेत. काही ठिकाणी राहण्याबरोबर खाण्याचीही व्यवस्था होत आहे.
समुद्र किनार्यांवर गर्दी
जिल्ह्याला विस्तृत आणि मनमोहक समुद्र किनारा लाभला आहे. त्यामध्ये अलिबाग- नागाव, वरसोली, मुरुड- काशिद, श्रीवर्धन- दिवेआगर, हरिहरेश्वर येथील समुद्रकिनारे पर्यटकांना भुरळ घालत आहे. हे सर्व समुद्र किनारे पर्यटकांनी हाऊसफुल्ल झाले आहेत. सर्वच किनार्यांवर पर्यटक बोटींग, घोडागाडी, बाईक राईडची मजा पर्यटक लुटत आहेत.
बल्लाळेश्वर, वरदविनायकाच्या दारी भक्तांची मांदियाळी
अष्टविनायकांपैकी दोन गणपती हे रायगडमध्ये आहेत. ते म्हणजे खालापुर तालुक्यातील महडचा वरदविनायक आणि सुधागड तालुक्यातील पालीचा बल्लाळेश्वर येथे भाविकांची दर्शनासाठी रीघ लागलेली आहे. मंदिराच्या आसपास असलेली फुल, हार, नारळ, प्रसाद, पुजेचे साहित्याची दुकाने सजली आहे. त्यांचा व्यवसाय तेजीत आहे.