। पनवेल । वार्ताहर ।
सिडकोने संपादित केलेल्या जमिनीवर आणि भूखंडावर मानवी आरोग्यास धोकादायक तसेच पर्यावरणास हानिकारक असलेले डेब्रिज टाकणार्या डंपर चालकांची सिडकोकडून धरपकड सुरुच आहे. सिडकोच्या पथकाने गव्हाण-जासई रोड एमटीएचएल लेबर कॅम्प लगतच्या जागेमध्ये डेब्रीज टाकण्यासाठी आलेले 5 डंपर पकडले आहेत. तसेच, त्यावरील डंपर चालकांविरोधात गुन्हा दाखल करुन त्यांना ताब्यात घेतले आहे.
सिडकोच्या भूखंडावर अनधिकृतपणे मोठ्या प्रमाणात डेब्रीज टाकण्यात येत असून हे डेब्रिज मानवी आरोग्यास धोकादायक आणि पर्यावरणास हानिकारक असल्याचे आढळून आले आहे. यामुळे सिडकोच्या भूखंडावर टाकण्यात येणार्या अनधिकृत डेब्रीजला आळा घालण्याच्यादृष्टीने सिडकोचे मुख्य दक्षता अधिकारी सुरेश मेंगडे यांच्या नेतृत्वाखाली दक्षता तपास अधिकारी, सुरक्षा विभाग अभियांत्रिकी विभाग आणि पोलीस पथकाकडून अनधिकृतपणे डेब्रीज टाकण्यास जाणार्यांची धरपकड करण्यात येत आहे.