नागरिकांनी पाणी जपून वापरावे सिडकोचे आवाहन

। अलिबाग । वार्ताहर ।
धरण क्षेत्रात अद्याप समाधानकारक पाऊस न झाल्याने, सिडको महामंडळातर्फे सिडको अधिकारक्षेत्रातील नोड आणि गावांतील नागरिकांना पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच पाटबंधारे विभागाने सिडको महामंडळास सूचित केल्यानुसार उपलब्ध पाणीसाठ्याचे काटेकोरपणे नियोजन करण्यासाठी 27 जूनपासून 25 टक्के पाणीकपात करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
सिडकोतर्फे सिडको अधिकारक्षेत्रातील विविध नोड, गावे आणि हेटवणे पाणी पुरवठा योजना जलवाहिनी मार्गावरील गावांना पाणी पुरवठा करण्यात येतो. सिडकोचे हेटवणे धरण, नवी मुंबई महानगरपालिकेचे मोरबे धरण, एमआयडीसीचे बारवी धरण आणि मजीप्राचे पाताळगंगा धरण या जलस्रोतांद्वारे सिडकोकडून पाणी पुरवठा करण्यात येतो. परंतु उपरोक्त धरण क्षेत्रांत अद्याप समाधानकारक पाऊस न झाल्याने उपलब्ध पाणीसाठ्याचे काटेकोरपणे नियोजन करता यावे याकरिता सिडकोकडून 27 जूनपासून 25 टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे. या पार्श्‍वभूमीवर नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करत सिडकोला सहकार्य करावे, असे आवाहन सिडकोतर्फे करण्यात आले आहे.

Exit mobile version