लाचखोर सिडको कार्यकारी अभियंत्याला अटक

ठेकेदाराचे बिल मंजूर करण्यासाठी दीड लाखांच्या लाचेची मागणी
। पनवेल । वार्ताहर ।
केलेल्या कामाचे बिलं मंजूर करण्यासाठी ठेकेदाराकडे दीड लाख रुपयांची लाचेची मागणी करुन त्यापैकी 30 हजारांची लाच स्वीकारणार्‍या सिडकोतील कार्यकारी अभियंता कल्याण पाटील याला ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी दुपारी रंगेहाथ अटक केली. विशेष म्हणजे, कल्याण पाटील याने पूर्वीची तीन बिले मंजूर करण्यासाठी 1 लाख 20 हजार रुपये स्वीकारले होते.
या प्रकरणातील विपीन पाटील हा ठेकेदार खारघर येथील कोपरी गावात राहण्यास असून, त्याने कळंबोळी ब्रिज, खांदा कॉलनी व खारघर रेल्वे स्टेशनची कामे पूर्ण केली होती. या तीन बिलांचे 7 लाख 56 हजार रुपयांचे बिल मंजूर करण्यासाठी कार्यकारी अभियंता कल्याण पाटील याने 2 लाख रुपये लाचेची मागणी केली होती. त्यानंतर पाटील यांनी दीड लाख रुपयांची मागणी केली होती. त्यामुळे ठेकेदार विपीन पाटील याने ठाणे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे लेखी तक्रार दिली होती. त्यानंतर कल्याण पाटील यांनी मागील बिलातील राहिलेली 30 हजारांची रक्कम घेऊन सीबीडीतील एमजीएम हॉस्पीटल जवळ बोलावले होते. त्यामुळे ठाणे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने याठिकाणी सापळा लावला होता. यावेळी त्याठिकाणी आपल्या चार चाकी कारमधून आलेल्या कल्याण पाटील यांनी ठेकेदार विपीन पाटील याच्याकडून 30 हजारांची रोख रक्कम स्वीकारल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्याला रंगेहाथ पकडले. त्यानंतर कल्याण पाटील याच्या विरोधात सीबीडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली.

Exit mobile version