| पनवेल | प्रतिनिधी |
विधानपरिषद निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे सिडको महामंडळाच्या भरती प्रक्रियेला पुन्हा ब्रेक लागला असून, विविध संवर्गांचे अंतिम निकाल आता निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच जाहीर होणार असल्याचे सिडको प्रशासनाने स्पष्ट केले आहे. आधी लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे रखडलेली भरती प्रक्रिया आता पुन्हा विलंबाच्या भोवऱ्यात सापडल्याने हजारो उमेदवारांमध्ये नाराजी वाढली आहे.
सिडको महामंडळाने 2023 ते 2025 या कालावधीत विविध 10 संवर्गातील 192 पदांसाठी अभियांत्रिकी, नियोजन, सर्वसाधारण गट, लेखा, वास्तुशास्त्र अशा विविध विभागांकरीता भरती प्रक्रिया सुरू केली. या उमेदवारांची ऑनलाईन परीक्षेसाठी सिडको मंडळाने आय.बी.पी.एस या बाह्य संस्थेला काम सोपवले होते. या संस्थेने त्यांच्याकडे उपलब्ध तारखेनूसार मागील वर्षी जून व जुलै महिन्यात पूर्ण केल्या.
सिडकोच्या म्हणण्यानुसार, 10 पैकी 4 संवर्गांची भरती प्रक्रिया पूर्ण झाली असून संबंधित उमेदवार सेवेत रुजू झाले आहेत. आणखी दोन संवर्गांचे निकाल पुढील काही दिवसांत जाहीर करण्याची तयारी सुरू आहे. उर्वरित चार संवर्गांची नियुक्तीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. परंतु, सिडकोची कार्यवाहीनूसार पात्र उमेदवारांची यादी जाहीर होण्याच्या मुहूर्तावरच राज्यात विधानपरिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली. आचारसंहिता संपल्यावरच यातील पात्र नियुक्तांच्या नावे जाहीर होणार असल्याने अजून महिनाभर तरी या उमेदवारांच्या नशीबी प्रतिक्षा आहे. त्यामुळे विधानपरिषदेची निवडणूक 18 जून आणि 22 जून रोजी निकाल लागल्यानंतरच आचारसंहिता संपेल. पात्र उमेदवारांची नावे त्यानंतरच सिडको जाहीर करेल असे नियोजन सिडकोने केले आहे.
सहाय्यक अभियंता सिव्हिल पदाच्या 101 जागांसाठी परीक्षा दिलेल्या उमेदवारांमध्ये यामुळे तीव्र नाराजी आहे. या पदासाठी 21 जुलै 2025 रोजी ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली होती. मात्र, दीर्घ कालावधी उलटल्यानंतरही अंतिम निकाल जाहीर झालेला नाही. सर्वाधिक उमेदवार असलेल्या या संवर्गाचा निकाल अद्याप प्रलंबित असल्याने उमेदवार संताप व्यक्त करत आहेत. याबाबत संबंधित उमेदवारांनी भरती प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव असून अंतिम निकाल कधी जाहीर होणार याबाबत सिडकोने स्पष्ट माहिती द्यावी, अशी मागणी उमेदवारांकडून होत आहे.
डॉ. राजा दयानिधी,
सिडको मंडळाने एका संवर्गातील पदांचे निकाल सुद्धा जाहीर केले. मात्र, या दरम्यान निवडणूकीची आचारसंहिता जाहिर झाली. परंतु, आचारसंहितेच्या काळात संबंधित उमेदवारांनाही नियुक्तीपत्र देता येत नाही. सिडको मंडळाने 18 ते 25 मे या दरम्यान सर्व संवर्गातील निकाल जाहीर करणे आणि नियुक्तीपत्र देणे ही प्रक्रिया करण्याचे नियोजनही केले होते. मात्र, निवडणूकीच्या आचारसंहिता लागू झाल्याने आचारसंहिता संपल्यावरच तातडीने पात्र उमेदवार आणि पडताळणीनंतर नियुक्तीपत्र देण्यात येईल.
सह व्यवस्थापकीय संचालक, सिडको मंडळ
