वाहतूक कोंडीने नागरिक हैराण; बाजारपेठेत वाहनांच्या लांबच लांब रांगा
| खांदा कॉलनी | प्रतिनिधी |
पनवेल शहरातील वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाला असून, मालवाहू वाहनांच्या बेशिस्त प्रवेशामुळे नागरिकांना दररोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. शहरात मालवाहू वाहनांसाठी ठरवून दिलेल्या प्रवेश वेळेचे सर्रास उल्लंघन होत असल्याने मुख्य रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत.
टपाल नाका, छत्रपती शिवाजी महाराज चौक, पनवेल बाजारपेठ आणि उरण नाका या महत्त्वाच्या परिसरात वाहतुकीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. अवजड आणि मालवाहू वाहने रस्त्यांवर उभी राहत असल्याने अन्य वाहनचालकांना मार्ग काढताना मोठी कसरत करावी लागत आहे. विशेषतः सकाळी आणि सायंकाळी गर्दीच्या वेळेत या कोंडीत मोठी भर पडते. दुचाकीस्वार, रिक्षाचालक तसेच पादचाऱ्यांनाही याचा त्रास सहन करावा लागत आहे. अनेकदा काही मिनिटांच्या अंतरासाठी नागरिकांना अर्धा ते एक तास वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागते. धक्कादायक बाब म्हणजे, शहरातील या महत्त्वाच्या चौकांमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांची नियमित उपस्थिती दिसून येत नाही. त्यामुळे वाहनचालकांकडून वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे चित्र आहे.
एकीकडे शहराचा विस्तार झपाट्याने होत असताना दुसरीकडे वाहतूक नियोजनाकडे मात्र दुर्लक्ष होत असल्याची नाराजी नागरिक व्यक्त करीत आहेत. मालवाहू वाहनांच्या प्रवेश वेळेवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात, तसेच गर्दीच्या ठिकाणी वाहतूक पोलिसांची नियमित नियुक्ती करावी, अशी मागणी होत आहे. पनवेल शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासन आणखी किती काळ वाट पाहणार? मालवाहू वाहनांच्या बेशिस्त प्रवेशाला आळा घालून नागरिकांना दिलासा मिळणार कधी? असा सवाल पनवेलकरांकडून उपस्थित केला जात आहे.
वाहतूक जनजागृतीची गरज
वाहतूक नियमाबाबत जनजागृती करण्यात येत असली, तरी नागरिक मात्र, शहाणे झाल्याचे दिसत नाही. भरधाव वाहन चालवणे, चौकातून चुकीच्या पद्धतीने गाडी चालवून वाहतुकीस अडथळा निर्माण करणे, सिग्नल सुरू असला तरी रस्त्यावर थांबायचे नाही, असे प्रकार सर्रास सुरू आहेत. त्यामुळे वाहतुकीला शिस्त लावायची कुणी, असा प्रश्न निर्माण झाला आहे.






