शटलच्या फेऱ्या वाढवण्याची मागणी
| नेरळ | प्रतिनिधी |
माथेरान या थंड हवेच्या ठिकाणी हिवाळी पर्यटन हंगाम सुरू झाला आहे. यावर्षी दिवाळी हंगाम चांगला जावा यासाठी नेरळ- माथेरान- नेरळ मार्गावर किमान पाच फेऱ्या चालवाव्या तर माथेरान अमन लॉज या दरम्यान पर्यटन हंगामात फेऱ्या वाढवण्यात याव्यात अशी मागणी स्थानिक व्यावसायिक यांनी केली आहे.
नेरळ- माथेरान- नेरळ मिनी ट्रेन माथेरान व्यवसायाची जीवन वाहिनी समजली जाते. या मार्गावर 1907 पासून मिनी ट्रेन सुरू झाली आणि तेंव्हापासून माथेरान मध्ये प्रामुख्याने उन्हाळ्यात पर्यटक येऊ लागले. त्यानंतर मागील दहा पंधरा वर्षात माथेरानचे पर्यटन बदलून गेले आहे. केवळ दिवाळी, नाताळ आणि नवीन वर्षे तसेच उन्हाळ्यातील दोन महिने येथे पर्यटक यायचे. मात्र, आता सर्वाधिक पर्यटक हे पावसाळ्यात येऊ लागले आहेत. पावसाळ्यात चार महिने सर्वाधिक पर्यटक माथेरानमध्ये आलेले असून दिवाळी हंगाम हा माथेरानमधील सर्वात पहिला सीझन समजला जातो. त्यात पावसाळी सुट्टीवर गेलेली मिनी ट्रेन 15 ऑक्टोबर रोजी पुन्हा सुरू होत असते, त्यामुळे दिवाळी हंगामात माथेरानचे हिवाळी पर्यटन सुरू होते.
यावर्षी दोन दिवसावर दिवाळी सण येऊन देखील माथेरानमध्ये पर्यटक नाहीत. माथेरानमधील पर्यटन हे प्रामुख्याने नेरळ- माथेरान- नेरळ मिनी ट्रेन आणि माथेरान अमन लॉज शटल सेवेवर अवलंबून असते. यावर्षी मिनी ट्रेनचा पर्यटन हंगाम सुरू झाला आहे, पण मिनी ट्रेनच्या नेरळ- माथेरान- नेरळ दरम्यान केवळ दोनच फेऱ्या सुरू आहेत. माथेरान ते अमन लॉज सेवेच्या फेऱ्या वाढवण्याची मागणी व्यावसायिक वसंत कदम यांनी व्यक्त केली आहे.
पर्यटन हंगामात सोमवार ते शुक्रवार सहा ऐवजी आठ आणि शनिवार-रविवार आठ ऐवजी दहा फेऱ्या कराव्यात.एक वस्तीची गाडी आणि दिवसाच्या फेऱ्या चार ते पाच अशी मागणी रेल्वेकडून मान्य झाल्यास मोठ्या प्रमाणावर पर्यटन व्यवसाय बहरेल.
सुभाष भोसले
व्यावसायिक






