| पनवेल | प्रतिनिधी |
सिडकोच्या पाणीपुरवठा व्यवस्थेतून थेट पाणी खेचण्यासाठी अनधिकृत बूस्टर पंपाचा वापर करणाऱ्या सोसायट्यांवर कारवाई करण्याचा इशारा सिडकोने दिला आहे. सर्व रहिवाशांना समान आणि सुरळीत पाणीपुरवठा मिळावा, यासाठी ही कारवाई करण्यात येणार असल्याचे सिडकोने स्पष्ट केले आहे.
सिडकोच्या अधिकाऱ्यांकडून सोसायट्यांच्या प्रवेशद्वार तसेच परिसरात तपासणी करण्यात येणार आहे. तपासणीदरम्यान सिडकोच्या पाणीपुरवठा वाहिनीतून थेट पाणी खेचण्यासाठी बूस्टर पंपाचा वापर आढळल्यास संबंधित पंप जप्त केला जाणार आहे. त्यानंतर संबंधित पाणीपुरवठा जोडणी खंडित करण्याची कारवाई केली जाईल. याशिवाय संबंधित सुरक्षा ठेव जप्त करण्याची तरतूदही करण्यात आली आहे. त्यामुळे सोसायट्यांनी आपल्या परिसरात अनधिकृत बूस्टर पंप बसवलेला किंवा वापरला जात नाही, याची खात्री करावी, असे आवाहन सिडकोने केले आहे.
कारवाईचे तीन टप्पे
सिडकोच्या अधिकाऱ्यांकडून परिसराची तपासणी केली जाईल. अनधिकृत बूस्टर पंप आढळल्यास तो जप्त केला जाईल. त्यानंतर संबंधित पाणीपुरवठा जोडणी खंडित करण्याची कारवाई केली जाणार आहे.







