। उरण । वार्ताहर ।
नवी मुंबई शहराला तसेच परिसरातील गावांना पाणी पुरवठा करणारी सिडकोची जलवाहिनी गव्हाण फाटा उड्डाण पूलाजवळ शनिवारी दि. २५ रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास फुटली आहे. या पाण्याचा प्रवाह ऐवढा मोठ्या प्रमाणात होता की जेएनपीटी बंदराच्या दिशेने जाणारी मालवाहू रेल्वे बंद पडली. या जलवाहिनीतून लाखो लिटर पाणी वाया गेले असून सिडकोने तात्काळ जलवाहिनी दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे.
पेण तालुक्यातील हेटवणे धरणातून नवीमुंबई व परिसरातील गावांना सिडकोच्या पाणी पुरवठा विभागाच्या माध्यमातून पाणी पुरवठा करण्यात येत आहे.त्यासाठी सिडकोने पेण ,उरण, पनवेल तालुक्यातील गावांतून आणि नवीमुंबई शहरातून जलवाहिनी टाकण्यात आली आहे.सिडकोच्या भ्रष्ट कारभारामुळे सदर जलवाहिनी फुटण्याच्या घटना वारंवार घडत आहेत.यामुळे शेतकऱ्यांच्या भात शेतीच आणि रहिवाशी, व्यापारी वर्गाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहेत.यासंदर्भात वारंवार तक्रार करूनही सिडकोच्या कडून शेतकरी, व्यापारी, रहिवाशांना नूकसान भरपाई मिळत नाही.