सिडको मेट्रो प्रकल्पाला आयसीआयसीआयचा पतपुरवठा

। नवी मुंबई । प्रतिनिधी ।
सिडकोच्या मेट्रो प्रकल्पाला आयसीआयसीआय बँकेकडून अर्थपुरवठा केला जाणार आहे. सिडको महामंडळ आणि आयसीआयसीआय बँक यांच्यात करार करण्यात आला. नवी मुंबई मेट्रो मार्ग क्र. 1 करिता 500 कोटींचा पतपुरवठा करण्यात येणार आहे. बँकेकडून मंजूर करण्यात आलेल्या पतपुरवठ्यामुळे मेट्रो मार्ग क्र. 1 प्रकल्पाकरिताची फायनान्शियल क्लोजर प्रक्रिया पूर्ण झाली आहे. सिडकोचे उपाध्यक्ष डॉ. संजय मुखर्जी, यांच्या नेतृत्वाखाली मेट्रो प्रकल्पातील एक मोठा टप्पा गाठला गेला आहे.

मेट्रो मार्ग क्र. 1 करीता रु. 3,400 कोटी इतका खर्च अंदाजित असून त्यापैकी रु. 2,600 कोटींचा खर्च सिडकोकडून यापूर्वीच करण्यात आला आहे. उर्वरित खर्च हा आयसीआयसीआय बँकेकडून करण्यात येणार्‍या रु. 500 कोटींच्या पतपुरवठ्याद्वारे आणि सिडकोच्या अंतर्गत संचित निधितून करण्यात येणार आहे. नवी मुंबई अंतर्गत कनेक्टिव्हिटी प्रदान करण्याच्या दृष्टीने मेट्रोचे प्रकल्प महत्त्वाचा असून येथील नागरिकांना प्रवासाचा उत्तम पर्याय देण्यासह बांधकाम क्षेत्राला चालना देण्याकरिता हा प्रकल्प मोलाची भूमिका बजावणार आहे.

आयसीआयसीआय बँकेकडून करण्यात येणार्‍या रु. 500 कोटींच्या पतपुरवठ्यामुळे मेट्रो मार्ग क्र. 1 वरील कामांना गती मिळणार असून नियोजित वेळेत कामे पूर्ण होऊन लवकरात लवकर या मार्गावर प्रवासी वाहतूक करता येणे शक्य होणार आहे. बँकेकडून मंजूर करण्यात आलेल्या पतपुरवठ्यामुळे एकप्रकारे सिडकोच्या प्रकल्पांच्या विश्‍वासार्हतेवर मोहोर उमटविण्यात आली आहे.
डॉ. संजय मुखर्जी,सिडको उपाध्यक्ष

पाच स्थानके सज्ज
नवी मुंबई मेट्रो मार्ग क्र. 1 वर 3 डब्यांची मेट्रो धावणार आहे. मार्ग क्र. 1 बेलापूर ते पेंधर हा 11.1 किमी लांबीचा व 11 स्थानके असणारा मार्ग आहे. या मार्गावरील व्हायडक्टचे काम पूर्ण झाले असून 11 पैकी 5 स्थानके प्रवासी वाहतुकीकरिता सुसज्ज झाली आहेत. या मार्गाकरिता सीएमआरएससह सर्व महत्त्वाच्या परवानग्या प्राप्त झाल्या आहेत. उर्वरित 6 स्थानकांचे काम वेगाने सुरू झाले असून संपूर्ण मार्गावर लवकरच प्रवासी वाहतूक सुरू होणे अपेक्षित आहे.

Exit mobile version