| नवी मुंबई | प्रतिनिधी |
सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी 28 मार्च रोजी सिडकोचा 2025-26 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासह गृहनिर्माण, नैना, मेट्रो, इंटरनॅशनल एज्युसिटी आणि पाणीपुरवठा योजना अशा विविध प्रकल्पांसाठी सर्वाधिक रू. 14,120 कोटी (खर्च) व रु. 14,130 कोटी (जमा) चा अर्थसंकल्प सादर केला आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, नैना, मेट्रो, इंटरनॅशनल एज्युसिटी, महागृहनिर्माण योजना इत्यादी सिडकोचे प्रकल्प महत्त्वाच्या टप्प्यावर आहेत. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांसोबतच नवी मुंबईतील सर्वसामान्यांसाठी महत्त्वाच्या असलेल्या इतर योजना जसे की कनेक्टिव्हिटी आणि पाणीपुरवठा इत्यादीसाठी 2025-26 च्या अर्थसंकल्पात 14 हजार 120 कोटी रकमेची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे हे प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण होण्यास मदत होईल व सामान्य नागरिकांना दिलासादेखील मिळेल, असा विश्वास विजय सिंघल यांनी व्यक्त केला.
या अर्थसंकल्पात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, नैना (नवी मुंबई विमानतळ प्रभाव अधिसूचित क्षेत्र), इंटरनॅशनल एज्युसिटी, मेट्रो प्रकल्प, पाणीपुरवठा योजना, ठाणे क्लस्टर डेव्हलपमेंट, उलवे कोस्टल रोड, खारघर-तुर्भे लिंक रोड, रेल्वे, आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट पार्क आणि नवीन शहर प्रकल्प यासारख्या प्रकल्पांसाठी रू. 14,120 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.