सदनिकाधारकांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
| नेरळ | प्रतिनिधी |
ठाणे शहरात विजय ग्रुप हे मोठे नाव असून, या बांधकाम कंपनीचे मालक अतीव गाला यांना नेरळ पोलिसांनी अटक केली आहे. नेरळ येथे विजय ग्रुपकडून विजय इस्टेट या नावाने सदनिका बांधल्या जात होत्या. मात्र, त्या प्रकल्पातील अनेक इमारतींचे काम अर्धवट अवस्थेत असून, सदनिकाधारक यांनी न्यायालयात धाव घेतल्यावर रेरा न्यायालयाच्या आदेशाने गुन्हा दाखल झाला आहे. नेरळ पोलिसांनी ठाणे येथून अतीव गाला यांच्यासारख्या मोठ्या बिल्डरला ताब्यात घेतले आहे.
ठाणे येथील बांधकाम क्षेत्रातील प्रसिद्ध नाव असलेल्या विजय ग्रुपचे मालक अतीव गाला यांच्या माध्यमातून कर्जत तालुक्यातील नेरळ कशेळे भीमाशंकर रस्त्यावर वाकस गावाच्या हद्दीत 100 एकर जमिनीमध्ये विजय इस्टेट येथे गृह निर्माण सोसायटी उभी राहात होती. तेथे सध्या 40 चे आसपास इमारती उभ्या असून, गेली सात-आठ वर्षे तेथील बांधकाम ठप्प झाले आहे. त्या ठिकाणी उभ्या राहणार्या घरासाठी मुंबई, ठाणे येथील नागरिकांनी गृह खरेदी केली होती. मात्र, अनेक वर्षांनंतरदेखील सदनिकाधारकांना घरे मिळत नसल्याने अखेर सदनिका खरेदी करणारे यांनी रेरा न्यायालयात धाव घेतली. त्यापैकी मुमाबी मानखुर्द येथील गजानन विनायक कागलकर हे व्यवसायाने डॉक्टर असलेल्या व्यक्तीने आपली विजय ग्रुप प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने फसवणूक केली असल्याचे नेरळ पोलीस ठाण्यात कागदपत्रांनिशी स्पष्ट केले आहे. त्यांनी जुलै 2015 साली विजय ग्रुप हौसिंग प्रायव्हेट लिमीटेडचे वाकस येथील प्रोजेक्टची जाहिरात इंटरनेटवर पाहीली होती.त्यानंतर याठिकाणी फेब्रुवारी 2017 साली फ्लॅट घेण्याचे ठरले. हा व्यवहार घोडबंदर रोड विजयनगरी ठाणे येथील विजय ग्रुप हौसिंग प्रायव्हेट लिमिटेड यांच्या कार्यालयात झाले होते.
त्यावेळी विजय ग्रुप तर्फे बिल्डर सुनिल सोनी यांनी फ्लटचा ताबा ऑक्टोबर 2020 साली देण्यात येईल असे नमूद केले होते. 2017मध्ये घर खरेदी करण्याची बायाना पावती आणि नंतर अॅग्रीमेंट करणार्या विजय ग्रुप हा गृह प्रकल्प 2018 मध्ये बंद पडला. सन 2018 पासून प्रोजेक्टचे काम बंद असल्याचे तसेच त्याचे सर्व कार्यालय बंद असल्याचे दिसून आले. त्यानंतर आम्ही बिल्डर यांस भेटण्याचे व संपर्क करण्याचे प्रयत्न केला. परंतु कोणत्याही प्रकारचा संपर्क झाला नाही. म्हणून घर घेणारे काही लोक महा रेरा न्यायालय चर्चगेट, मुंबई येथे सन 2020 साली तक्रार दाखल केली आहे. न्यायालयाच्या तक्रार अर्जावर निकाल येणे प्रलंबित असल्याचे दिसून आले आणि आपली फसवणूक झाली असल्याचे कागलकर यांना कळून चुकले होते. नेरळ पोलीस ठाण्यात एप्रिल-2021 मध्ये तक्रारी अर्ज दिला होता. त्यामध्ये अतिव गाला यांनी सदर घर खरेदी करणारे इतर अर्जदारांचे पैसे 20 जून 2021 रोजी व्याजासह रेरा कोर्टाच्या आदेशाप्रमाणे परत देतो, असे पोलिसांनी घेतलेल्या जबाबामध्ये सांगितले होते. परंतु, आतापर्यंत कोणालाही पैसे परत दिलेले नाही किंवा फ्लॅटचा ताबा दिलेला नाही. त्यामुळे अखेर विजय ग्रुपचे मालक अतीव गाला यांना नेरळ पोलिसांनी ताब्यात घेऊन या गुन्ह्यात अटक केली आहे. नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.