खारघरमध्ये अनियमित पाणीपुरवठ्यामुळे नागरिक संतप्त

हंडा मोर्चाचा इशारा

| पनवेल | विशेष प्रतिनिधी |

खारघर नोडमध्ये सुरू असलेल्या अनियमित आणि कमी दाबाच्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिक, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. नियमित वेळेत पाणीपुरवठा करण्यात आला नाही, तर पनवेल महानगरपालिकेवर हंडा मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपजिल्हाप्रमुख भरत पाटील यांनी दिला आहे.

महाराष्ट्रात सध्या उष्णतेची लाट सुरू असताना खारघरमधील अनेक सेक्टरमध्ये कधी दिवसा तर कधी मध्यरात्री 12 ते 2 वाजण्याच्या दरम्यान अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. अनियमित वेळेमुळे महिलांना, ज्येष्ठ नागरिकांना आणि लहान मुलांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे भरत पाटील यांनी महापालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

पनवेल महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने सकाळी आणि रात्री अशा दोन वेळा निश्चित केल्या असल्या तरी प्रत्यक्षात कोणत्याही ठराविक वेळेशिवाय पाणीपुरवठा होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. कमी दाबामुळे पाण्याच्या टाक्या भरत नसल्याने नागरिकांच्या दैनंदिन कामांवर परिणाम होत असून आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे.

सिडको, नवी मुंबई महानगरपालिका आणि एमआयडीसी यांच्याकडून पुरेसे पाणी उपलब्ध होत नसल्याचा आरोप करत या संपूर्ण नियोजनशून्य कारभाराचा शिवसेनेने निषेध केला आहे. महिलांना रात्रभर पाण्यासाठी जागावे लागत असल्याने प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.

पाणीपुरवठा विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तातडीने सूचना देऊन सकाळ, दुपार आणि संध्याकाळ या वेळांमध्ये नियमित पाणीपुरवठा सुरू करावा, अन्यथा खारघर परिसरातील महिला आणि नागरिकांच्या सहभागातून पालिकेवर हंडा मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा भरत पाटील यांनी दिला आहे. या निवेदनाची प्रत सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक यांनाही देण्यात आली आहे.

Exit mobile version