| महाड | प्रतिनिधी |
महाडमध्ये लाडवली येथील घनकचरा प्रकल्पामुळे निर्माण झालेल्या तीव्र दुर्गंधीविरोधात या प्रकल्पाच्या परिसरातील गोंडाळे ग्रामस्थांनी गुरुवारी (दि.16) नगरपरिषद कार्यालयावर धडक दिली. तसेच, नगराध्यक्ष मुख्याधिकाऱ्यांच्याकडे आपली व्यथा मांडून आरोग्य आणि पर्यावरणाचा मोठा प्रश्न निर्माण झाल्याचे निदर्शनास आणून दिले.
दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त असून लहान मुले, महिला आणि ज्येष्ठांना याचा मोठा फटका बसत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच प्रकल्पामुळे नदीचे पाणी दूषित होत असल्याचे आणि त्यामुळे पशुपक्षी जलचर यांच्या जीवास धोका निर्माण झाल्याची गंभीर तक्रारही ग्रामस्थांनी केली आहे. याबाबत तोडगा न काढल्यास हा प्रकल्प अन्यत्र हलवण्यात यावा, अशी विनंतीदेखील ग्रामस्थांनी केली असून दुर्गंधीवर तातडीने उपाययोजना न केल्यास आंदोलन अधिक तीव्र करणार असल्याचे सांगितले आहे. नगराध्यक्ष सुनील कविस्कर यांनी 10 ते 15 दिवसांत तोडगा काढण्याचे आश्वासन दिले असून, प्रकल्प स्थलांतराबाबतही प्रस्ताव मांडण्याची तयारी दर्शवली आहे.
आश्वासनानंतर ग्रामस्थांनी नगराध्यक्षांना निवेदन सादर केले असून, पुढील कार्यवाहीकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त
