नगराध्यक्षा आराधना दांडेकर यांचे प्रतिपादन
स्वच्छतेबाबत विशेष कृती आराखडा बैठक
। आगरदांडा । प्रतिनिधी ।
मुरूड कोळी समाज व्यावसायिक आणि नगरपरिषद यांच्या संयुक्त प्रयत्नातूनच मुरूडचे वैभव जपता येईल. तरी आजच बदलाची सुरुवात करुया आणि स्वच्छ आणि सुंदर मुरुड बनुया. त्याकरिता तुमचे योगदान महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन नगराध्यक्षा आराधना दांडेकर यांनी केले. मुरूड जंजिरा नगरपरिषद कार्यालयातील नगराध्यक्षा दालनात मच्छी मार्केट, मटण मार्केट आणि कोळीवाडा परिसरातील स्वच्छतेबाबत विशेष कृती आराखडा बैठकीच्या वेळी त्या बोलत होत्या.
यावेळी स्वच्छतेचे फायदे व अस्वच्छतेचे परिणाम या संदर्भातला चित्रफित प्रोजेक्टवर दाखविण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा आराधना दांडेकर, करनिरीक्षक- अनिकेत जगदाळे, नगरसेविका प्रांजली मकु, नगरसेविका-अंकिता गुरव, आरोग्य उपसभापती – सुगंधा मकु, नगरसेवक – पाडुरंग आरेकर, नगरसेवक -आदेश दांडेकर, महादेव कोळी समाज नवापाडा अध्यक्ष – कृष्णा बळी, शहर समन्वयक – सचिन कोरके पाटील,अमोल रणदिवे,सुरेंद्र मकु, गणेश नाखवा, पांडुरंग गाणार,किसन बळी, आदिंसह कोळी समाजाचे महिला -पुरुष मंडळी उपस्थित होते.
यावेळी नगराध्यक्षा आराधना दांडेकर यांनी अस्वच्छतेबाबत नाराजी व्यक्त केली. त्या म्हणाल्या, कोळीवाडा मच्छी मार्केट परिसरात व समुद्रकिनारी सांडपाणी, कचऱ्याचे ढीग तसेच, मच्छी व मटण मार्केटच्या मागे अस्वच्छता, दुर्गंधी पसरलेली असते. यामुळे रोगराई निर्माण होईल व आपल्या नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होईल. आपल्या परिसरात नगरपरिषदेमार्फेत नियमित साफसफाई केली जाते. परंतु, काही नागरिकांकडून पुन्हा प्लास्टिक व घनकचरा रस्त्यावर, समुद्रकिनारी टाकला जातो. हे कुठे तरी थांबलं पाहिजे. जोपर्यत नागरिक कचरा टाकणे थांबवत नाहीत, तोपर्यंत मुरूड स्वच्छ होणार नाही. या अस्वच्छतेमुळे या ठिकाणी संसर्गजन्य आजारांचा धोका वाढेल. त्याबरोबर सागरी पर्यावरणाचा ऱ्हास होईल. जलचर प्राण्यांना धोका निर्माण होईल. तसेच पर्यटन क्षेत्रावर परिणाम होऊन आर्थिक उत्पन्नाचा फटका आपल्याला बसेल.
कोळीवाडा आणि मुरुडचे भविष्य एकच आहे, कोळी समाजाची उपजीविका मच्छीमारी व या ठिकाणाचा मार्केट आहे. हेच अर्थव्यवस्थेचा मुख्य आधार आहे. कोळीवाड्याची स्वच्छता ही केवळ एक नियम नाही, तर मुरुडच्या आर्थिक विकासाची गुरुकिल्ली आहे. स्वच्छ व सुरक्षित किनारे पर्यावरणपुरक आणि कचरामुक्त समुद्रकिनारा करुया. तसेच ब्ल्यु फ्लॅग प्रमाणपत्र मिळविण्यासाठी प्रयत्न करुया. ज्यामुळे आंतरराष्ट्रीय ओळख होईल आणि पर्यटन वाढेल जागतिक नकाशावर मुरूडचे नाव कोरल जाईल. यामुळे पर्यटनवृध्दीमुळे स्थानिक व्यवसायांना व कोळी समाजाला मोठी चालना मिळेल. तरी स्वच्छ मुरूडकरिता नगरपरिषदेच्या स्वच्छता नियमांचे काटेकोर पालन करा. प्लास्टिकचा वापर थांबवावा. घरातला कचरा कचराकुंडीत ठेवा आणि येणाऱ्या नगरपरिषदेच्या घंटागाडीत सुखा व ओला कचरा वेगळा करुन टाका. जर कचरा रस्त्यावर टाकलात तर त्या व्यक्तीवर कठोर दंडात्मक कारवाई केली जाईल. स्वच्छतेला आपण कोळीवाडा मच्छी मार्केटपासून सुरुवात करायची आहे, तरी कोळी समाजाच्या सर्व महिलांनी व पुरुषांनी आपला परिसर स्वच्छ व सुंदर करण्याकरिता आम्हाला सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्षा आराधना दांडेकर यांनी केले.
यावेळी आलेल्या कोळी समाजाच्या महिलांनी आपले मत व्यक्त करताना म्हणाले की, सकाळी ९ वाजेपर्यंत रोजच्या रोज घंटा गाडी आली पाहिजे. घंटागाडीच्या सफाई कामगारांना प्रत्येक घरातून कचरा उचलायला पाहिजे. जर कोणी कचरा समुद्रात रस्तावर फेकत असतील, त्याकरिता आपल्या नगरपरिषदमार्फत कोळीवाडा परिसरात व समुद्रकिनाऱ्यांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवावा, जेणेकरून कचरा टाकवणार आळा बसेल आणि याठिकाणाचा परिसर स्वच्छ राहिल. स्वच्छता या विषयावर कोळी महिला व पुरुषांनी विविध मुद्दे मांडले. यावर सकारात्मक चर्चा झाली. तसेच,नगराध्यक्षा आराधना दांडेकर यांनी लवकरच कोळीवाडा समुद्रकिनारी परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जातील, असे आश्वाशित केले.







