एमएमआरडीएच्या कामांवर नागरिकांची नाराजी

। माथेरान । वार्ताहर ।
एमएमआरडीएच्या माध्यमातून माथेरान सारख्या दुर्गम भागात करोडो रुपये खर्च करून रस्त्यांची कामे सुरू आहेत. परंतु त्या कामांना न्याय मिळवून देण्यासाठी संबंधीत ठेकेदाराने कोणत्याही प्रकारचा प्रयत्न केलेला नसून प्रत्येक कामात चालढकल केल्यामुळे कामांचा दर्जा पूर्णपणे घसरला आहे. या ठेकेदाराकडून होणार्‍या कामांवर अंकुश ठेवण्यासाठी एमएमआरडीएच्या अभियंत्यांची नैतिक जबाबदारी असताना कामे निकृष्ठ दर्जाची का झाली आहेत आणि अजूनही होणारी कामे नक्कीच चांगल्या पद्धतीने केली जातील की नाही याबाबत स्थानिकांसमोर प्रश्‍नचिन्ह उभे राहिले आहे.

मुख्य रस्त्यांची कामे करताना त्यावर क्ले पेव्हर ब्लॉक लावण्यात आलेले आहेत. त्यांची क्वालिटी चांगल्या दर्जाची नसल्याने जेमतेम दोन ते तीन वर्षे हे ब्लॉक ह्या रहदारीच्या रस्त्यावर तग धरू शकतील असे सुध्दा बोलले जात आहे. विशेष म्हणजे माथेरान मध्ये पावसाचे प्रमाण अधिक असते त्यामुळे हे रस्ते बनविताना पाणी वाहून जाण्यासाठी गटाराच्या बाजूने उतार देणे आवश्यक होते. परंतु कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी ह्या ठेकेदाराने सपाटा लावला होता. त्यामुळे ना कुठेही उतार वा नियोजन त्यामुळे पहिल्याच पावसात माती, घोड्यांची लीद यांचा थर अनेक ठिकाणी साचलेला होता. यातून मार्ग काढताना स्थानिकांना, कष्टकरी हातरीक्षा चालकांना, घोडेवाले तसेच पर्यटकांना खूपच जिकिरीचे बनले होते. याबाबत एमएमआरडीएचे कार्यकारी अभियंता अरविंद धाबे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की आम्ही एक पावसाळा पाहून हे पाणी कशाप्रकारे वाहून जात आहे त्याप्रमाणे पाणी जाण्यासाठी जागा करणार होतो. त्यामुळे आता पावसाळी हंगामात पर्यटकांची गैरसोय होऊ नये यासाठी नुकताच नगरपरिषदेच्या माध्यमातून रस्त्याच्या कडेला दगडी आणि ब्लॉक काढून पाणी जाण्यासाठी जागा केली जात आहे.

माथेरानमधील चढ उतार असणारे रस्ते लक्षात घेता करोडो रुपये खर्च करीत असताना एमएमआरडीए सारख्या मान्यता प्राप्त संस्थेने पावसाच्या पाण्याचा निचरा व्यवस्थित कसा होईल हे पाहणे गरजेचे होते. तसेच सांडपाण्याचा निचरा, भूमिगत विद्युत वाहिन्या याचे नियोजनबद्ध काम अपेक्षित होते. परंतु हे नियोजन कागदावर राहिले आहे.

– शिवाजी शिंदे, माजी विरोधी पक्षनेते माथेरान नगरपरिषद
Exit mobile version