पोलादपुरात तोतया पत्रकार, तोतया पोलिसाचा ‌‘डॉक्टर‌’ अवतार उघड

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

बापलेकांच्या हैदोसाला सामाजिक संघटनेचा चाप

| पोलादपूर | प्रतिनिधी |

पोलादपूर तालुक्यात अरेरावी, धमक्या आणि तोतया पदांच्या नावाखाली नागरिकांना त्रास देणाऱ्या बापलेकांच्या कारवायांवर अखेर ‌‘आपली माती आपली माणसं‌’ सामाजिक संघटनेने लगाम घातला. तोतया पत्रकार, तोतया पीएसआय आणि आता ‌‘डॉक्टर‌’ म्हणून वावरणाऱ्या अनिकेत मेस्त्रीच्या नव्या अवतारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलादपूर शहरात गेल्या काही वर्षांपासून प्रदीप मेस्त्री उर्फ सुतार हा कधी दुबई रिटर्न, कधी कॉम्प्युटर, सिव्हिल किंवा आयटी इंजिनियर, कधी भाजप कार्यकर्ता, कधी संभाजी ब्रिगेड पदाधिकारी तर कधी पत्रकार असल्याचे सांगत वावरत होता. शासकीय व राजकीय कार्यक्रमांमध्येही तो पत्रकार म्हणून सहभागी होत असल्याची चर्चा आहे.

दरम्यान, त्याचा मुलगा अनिकेत मेस्त्री याने पोलिसांची खाकी वर्दी परिधान करून स्वतःला पीएसआय अनिकेत मेस्त्री म्हणून महाड, पोलादपूर व माणगाव परिसरात फिरत ट्रक, डंपर व कंटेनर अडवून पैसे उकळल्याचे आरोप आहेत. महाड तालुक्यातील चिंभावे येथे माध्यमिक शाळेत पीएसआय म्हणून लेक्चर देतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर महाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी काळे यांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

दरम्यान, प्रदीप मेस्त्री उर्फ सुतार याने काही जणांविषयी आक्षेपार्ह भाषा वापरल्याचे ऑडिओ-व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ‌‘आपली माती आपली माणसं‌’ सामाजिक संघटनेचे संस्थापक राज पार्टे यांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यानंतर पोलादपूर पोलिसांनी प्रदीप मेस्त्री उर्फ सुतार आणि त्याचा मुलगा अनिकेत मेस्त्री यांना पोलीस ठाण्यात बोलावून घेतले.

यावेळी अनिकेत मेस्त्री सध्या स्वतःला डॉ. अनिकेत प्रदीप मेस्त्री म्हणून ओळख देत असल्याचे उघड झाले. पोलिसांनी तक्रारी मागवल्यानंतर काही तक्रारींवरून प्रदीप मेस्त्री उर्फ सुतार याच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक आनंद रावडे यांनी दिली.

दरम्यान, सारथी महाराष्ट्राचा या वृत्तपत्राने प्रदीप मेस्त्री याला संस्थेतून बरखास्त केल्याचा मेसेज पाठविल्याची माहिती ‌‘आपली माती आपली माणसं‌’ सामाजिक संघटनेचे संस्थापक राज पार्टे यांनी दिली.

Exit mobile version