। पनवेल । वार्ताहर ।
पोलीस असल्याचे भासवून एका लुटारुने आणि त्याच्या साथीदाराने भररस्त्यात एका ज्येष्ठ नागरिकाला अडवून त्याच्या जवळचे सुमारे दिड लाख रुपये किंमतीचे दागिने हातचलाखीने लुबाडून नेल्याची घटना पनवेल शिळ मार्गावर किरवली येथे घडली. तळोजा पोलिसांनी या प्रकरणी तोतया पोलिसासह दुक्कली विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
सदर प्रकरणात लुबाडण्यात आलेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव राजकुमार प्रजापती (67) असे असून ते कळंबोली, सेक्टर-1ई मध्ये राहण्यास आहेत. प्रजापती यांची विवाहित मुलगी कल्याण येथे राहण्यास असल्याने ते स्कुटीवरुन कल्याण येथे जात होते. शिळफाटा टोल नाकाच्या पुढे पनवेल-शिळ हायवेवरील किरवली गावाजवळ त्यांच्या पाठीमागून अॅक्टीव्हा स्कुटीवरुन आलेल्या एका तोतया पोलिसाने ओव्हरटेक करुन त्यांना अडवले. त्यानंतर त्याने प्रजापती यांना पोलीस खात्याचे चिन्ह असलेले ओळखपत्र दाखवून स्कुटी बाजुला घेण्यास सांगितले. त्यानंतर तोतया पोलिसाने प्रजापती यांना बोलण्यात गुंतवून त्यांच्या हातातील घड्याळ, सोन्याचे ब्रेसलेट, चेन, अंगठी, लॉकेट या सर्व वस्तू रुमालात बांधून देण्याच्या बहाण्याने आपल्याकडे घेतल्या. त्यानंतर त्याने प्रजापती यांचे सर्व दागिने हातचलाखीने काढून घेत घड्याळ आणि मनीपर्स असलेले रुमाल देऊन साथीदारासह पलायन केले. प्रजापती स्कुटीवरुन काही अंतर पुढे गेल्यानंतर त्यांना संशय आल्याने त्यांनी स्कुटीच्या डिकीमध्ये रुमाल तपासला असता त्यात बांधुन ठेवलेले दागिने नसल्याचे आढळून आले. अखेर आपली फसवणुक झाल्याचे लक्षात आल्यानंतर प्रजापती यांनी तळोजा पोलीस ठाणे गाठून तक्रार केली.