। धाटाव । वार्ताहर ।
रोहा तालुक्यातील धाटाव औद्योगिक वसाहतीत वायू प्रदूषणाबरोबर जलप्रदूषणाचा प्रश्न मात्र आता अधिकच गंभीर होत चालला आहे. सध्या धुवाधार सुरु असलेल्या पावसाच्या पाण्याचा आधार घेत कारखानदार रासायनिक सांडपाणी थेट औद्योगिक वसाहतीच्या अंतर्गत असलेल्या नाल्यात, तर दुर्मिळ वायूसुद्धा वातावरणात सोडले जात आहेत. हे घातक रासायनिक सांडपाणी नाल्यावाटे लगतच्या कुंडलिका नदीच्या पात्राला मिळत आहे. दरम्यान, या पाण्यामुळे व दुर्मिळ वायूमुळे येथील परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरत असल्याने लगतच्या रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
धो-धो कोसळणार्या पावसाच्या पाण्याचा आधार घेत घातक प्रकारचे रासायनिक सांडपाणी नाल्यातून सोडले जात आहे. लाल, पिवळ्या, हिरव्या रंगाच्या पाण्याने धाटाव औद्योगिक वसाहतीतील नाले अक्षरशः काही ठिकाणी तुंबले आहेत, तर काही ठिकाणी ओसंडून वाहत आहेत. रस्त्याच्या बाजूला असलेले सांडपाण्याचे चौकोनी चेंबर वाहतुकीला अडथळा निर्माण करीत असल्याने या चेंबरची काही ठिकाणी चांगलीच पडझड झाल्याचे दिसते. शून्य नियोजनात असलेले हे चेंबर अपघातालाही कारणीभूत ठरत आहेत. आज सायंकाळदरम्यान सोडलेल्या प्रचंड दुर्मिळ वायूने या परिसरात रस्त्यावर काहीच दिसेना अशी अवस्था झाल्याचे पहावयास मिळाले, तर अनेकांना श्वास घेण्यास त्रास झाल्याचे पहावयास मिळाले. धाटाव रोजच सुरू असलेल्या पांढर्या रंगाच्या दुर्मिळ वायूमुळे याठिकाणी ठसका लागणे, मळमळणे व डोळ्यांची चुरचुर ही कायमच आहे. त्यामुळे कारखानदारांनी याबाबत गांभीर्याने घ्यावे, अन्यथा प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकारी वर्गाने याबाबत अधिक लक्ष न दिल्यास पुढे होणार्या प्रकाराला सामोरे जावे असे सांगितले.
मात्र या घातक रासायनिक सांडपाण्याबाबत कारखान्यांवरील प्रदूषण महामंडळाचे नियंत्रण सध्या सैल झाल्याचे पहावयास मिळत आहे. पावसाच्या पाण्याचा आधार घेत या नाल्यातून वारंवार जलप्रदूषण व वातावरणात दुर्मिळ वायू सोडत असलेल्या या कारखान्यांवर कोणती कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.