पर्यटकांचे लोंढे परतीच्या दिशेने
| माणगाव | वार्ताहर |
माणगाव शहरात सलग लागलेल्या सुट्ट्या त्यातच लगीनघाई आणि पर्यटकांची कोकणात उसळलेली गर्दी यामुळे नागरिकांना वाहतूक कोंडीशी सामना करावा लागला. त्यातच दरवर्षीप्रमाणे यंदाचे वर्षीही मोठ्या प्रमाणात एप्रिल व मे महिन्यात लग्न असल्याने अनेकांची लगीनघाई तर कांहीची उन्हाळी सुट्टीसाठी लगबग त्यातच पर्यटकांची गर्दीमुळे महामार्गावर तासनतास प्रवाशांची राखडपट्टी होत आहे. गेल्या महिन्यापासून सुट्ट्या शुक्रवार, शनिवार, रविवार तर कधी शनिवार, रविवार, सोमवार अशा आल्याने निसर्गाचे आकर्षण पर्यटकात वाढले असून मुंबई, पुणे व इतर जिल्ह्यातून पर्यटक मोठ्या प्रमाणात कोकणात गेले होते. त्यामुळे माणगाव शहरात वाहतूक कोंडीवर यांचा ताण पडत आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीने गेले महिनाभरापासून माणगावकरांची डोकेदुखी कायम राहिली आहे. कोकण भ्रमंती नंतर पर्यटकांचे लोंढे परतीला निघाले आहेत. वाहतूक कोंडीचा मात्र नागरिकांना फटका बसला आहे. मुंबई, पुणे व इतर जिल्ह्यातून पर्यटक कोकणात आले होते.
माणगाव हे मुंबई गोवा महामार्गावरील मध्यवर्ती ठिकाण असल्याने या बाजारपेठेत मोठया प्रमाणात सकाळपासून संध्याकाळ पर्यंत वाहतुकीची कोंडी होत आहे. त्यामुळे ही वाहतुकीची कोंडी माणगावकरांसह सर्वांचीच डोकेदुखी ठरली असून माणगावात वाहतूक कोंडीची साडेसाती कायम भेडसावत आहे. महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम जलद गतीने झाल्यास माणगाव बाजारपेठेतील वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमचा निकाली निघेल अशी पर्यटकातून चर्चा होत आहे. कोकणच्या विकासाचा मार्ग ठरणाऱ्या आणि वाढत्या अपघातांना पायबंद घालण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे आजही भिजत घोंगडे आहे. सामाजिक संघटना, कार्यकर्ते व प्रवाशांच्या रेट्यामुळे सरकारला या प्रश्नाकडे लक्ष घालावे लागले असले तरी शासनांनी या बाबत वेळकाढूपणा चालवला आहे.
प्रवासी नागरिकातून याबाबत असंतोष खदखदत आहे. इंदापूर ते महाड तसेच ताम्हिणी घाट ते माणगाव दरम्यान मोठ्या प्रमाणात अपघात दिवसेंदिवस होत असून या मार्गावरून प्रवाशांना प्रवास असुरक्षित वाटत आहे. या दरम्यानच्या मार्गावर अनेकांचे अपघातात निष्कारण बळी जात आहेत. परंतु मुंबई-गोवा महामार्गावरील इंदापूर ते टेमपाले दरम्यानच्या रखडलेल्या कामाला पाहिजे तेवढी गती मिळत नाही. त्यातच इंदापूर व माणगाव येथील बायपासच्या कामाला गती मिळत नाही. त्यामुळे पूर्वीच्याच मार्गावर या वाहतुकीची भर पडत आहे. त्यामुळे माणगाव बाजारपेठेतील वाहतुकीची कोंडी ही सर्वांचीच डोकेदुखी ठरत आहे.