| पाली | प्रतिनिधी |
ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर खुरावले फाटा ते वाघोशी रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, प्रवाशांसह चाकरमान्यांना आणि स्थानिक नागरिकांना मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचा सामना करावा लागत आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत कोट्यवधी रुपये खर्चून करण्यात आलेल्या या रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्याचा थेट आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे.
पेण-सुधागड या मतदारसंघाला जोडणारा हा अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. या मार्गावर अनेक गावे, वाड्या आणि आदिवासी वस्त्या वसलेल्या आहेत. दररोज शेकडो ग्रामस्थ, चाकरमानी आणि विद्यार्थ्यांची या रस्त्यावरून ये-जा असते. मात्र, रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. सध्या सर्वत्र लाडक्या गणरायाच्या आगमनाची लगबग सुरू आहे. गणेशोत्सवासाठी चाकरमानी गावी दाखल होत असतानाच रस्त्याच्या या दुरवस्थेमुळे त्यांच्या आनंदावर विरजण पडले आहे. खड्ड्यांमुळे वाहनांचे मोठे नुकसान होत असून, अपघातांचे प्रमाण वाढले आहे. तसेच, आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना रुग्णालयात नेताना मोठी कसरत करावी लागत आहे, तर दुसरीकडे खड्ड्यांमुळे बस व वाहतूक सेवा विस्कळीत होत असून, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. एकीकडे शासन खड्डेमुक्त रस्त्यांचा दावा करत असताना, दुसरीकडे लोकप्रतिनिधी आणि संबंधित प्रशासकीय यंत्रणेचे या रस्त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याने परिसरातील नागरिकांमधून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.






