डोंगर उतारावरील घरांना धोका
| महाड | वार्ताहर |
महामार्गाच्या चौपदरीकरण कामांमध्ये अनेक नागरिकांची घरे, शेत जमीन संपादित झाल्या. मोबदला दिल्यानंतर या जमिनीचा आणि घरांचा ताबा शासनाकडे आला. मात्र, गांधार पाले गावाजवळ डोंगर उतारावर असलेल्या घरामधील नागरिकांनी अद्याप आपला ताबा सोडलेला नाही यामुळे एन पावसाळ्यात महामार्गाचे खोदकाम सुरू असल्याने या घरांना धोका निर्माण झाला आहे.
महाड तालुक्यातील साहिल नगर, गांधार पाले या ठिकाणी डोंगर उतारावर खोदकाम करून महामार्गाचे काम सुरू आहे. महामार्गाच्या कामात आलेल्या घरांचा मोबदला स्थानिक नागरिकांना दिला गेला आहे. शिवाय खोदकाम होत असल्याने वरील बाजूस असलेल्या घरांना धोका निर्माण होऊ शकतो या कारणास्तव त्यांची देखील घरे संपादन करून मोबदला देण्यात आला. मात्र, आज देखील अनेक जण सुरक्षित स्थळी स्थलांतर न होता धोकादायक घरातच वास्तव्यास आहेत. ऐन पावसाळ्यामध्ये खालील बाजूस महामार्गाचे खोदकाम सुरू असल्याने डोंगर उतारावरील माती भूस्खलन होऊन खाली येऊ शकते. त्यामुळे, अशा धोकादायक ठिकाणी राहणाऱ्या लोकांना प्रशासनाकडून नोटीसा देण्यात आलेल्या आहेत मात्र या नोटिसांना न जुमानता आहे तेथेच काही नागरिक वास्तव्य करून आहेत अशा नागरिकांची चौकशी व्हावी, अशी मागणी करण्यात आले आहे.
महामार्गावर अनेक ठिकाणी खोदकाम सुरू आहे खोदकाम सुरू असलेल्या जागे च्या वरील बाजूस आजही अनेक घरांमध्ये नागरिकांचे वास्तव्य आहे. या ठिकाणी भूस्खलन होऊन धोका निर्माण होऊ शकतो. मात्र याकडे प्रशासनाचे देखील दुर्लक्ष आहे. नागरिकांनी केलेला तक्रारीकडे स्थानिक प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने भविष्यात या ठिकाणी धोका निर्माण होऊ शकतो.
गांधार पाले गावाजवळ प्रशासनाच्या सूचनेनुसार धोकादायक स्थितीत असलेल्या घरांना नोटीस बजावल्या आहेत. मात्र, स्थलांतर कोठे करायचे, असा प्रश्न नागरिकांसमोर आहे.
पवार, सरपंच, गांधारपाले